ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात "स्वच्छ माझे अंगण अभियान"

सिंधुदुर्गनगरी, दि.2.(जि.मा.का.): जिल्ह्यातील सर्व कुटुंब स्तरावर वैयक्तिक शौचालय, सांडपाणी व्यवस्थापन करीता शोषखड्डा / परसबाग / पाझरखड्डा, घनकचरा व्यवस्थापन करीता कंपोस्ट खत्त खड्डा अथवा घरगुती खत खड्डा आणि कुटुंबस्तरावर कचराकुंडी या बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी होवून स्वच्छतेची सवय अंगीकृत करण्यासाठी लोकचळवळ उभी करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात दिनांक 1 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 कालावधीत "स्वच्छ माझे अंगण अभियान" राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व कुटुंबांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी केले आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा 2 अंतर्गत वैयक्तिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापन (कुटुंबस्तर), सांडपाणी व्यवस्थापन (कुटुंबस्तर) राबवत नित्य नियमाने स्वच्छतेच्या बाबींची सवय अंगिकृत केली आहे. अशा कुटुंबाना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे अनुकरण करण्याकरिता इतर ग्रामस्थांना, कुटुंबधारकांना त्यांच्या प्रमाणेच वैयक्तिक स्वरुपांच्या स्वच्छतेच्या सुविधा आपल्या घरात किंवा परिसरात उपलब्ध करून घेण्यासाठी उदयुक्त करणे. हा या उपक्रमाचा उद्देश आहे.वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर करणे, शौचालयाची दैनंदिन स्वच्छता, शाश्वत स्वरुपात सर्व कुटुंब सदस्यांकडून वापर आणि ही सुविधा निरंतर टिकावी म्हणून आवश्यक ती देखभाल दुरुस्ती करण्यात कुटुबांचा पुढाकार घ्यावा. कुटुंबस्तरावर दैनंदिन घनकचऱ्याचे वर्गिकरण करणे, कुटुंबस्तरावर सुका कचरा, ओला कचरा कुंड्यामध्ये वर्गीकरण करणे. वर्गीकरण केलेल्या घरगुती कचऱ्याचे कंपोस्ट खतखड्डा अथवा घरगुती खतखड्डा निर्मिती करुन कचऱ्याचे, घर किंवा घराच्या परिसरातच व्यवस्थापन करणे. तसेच सांडपाणी व्यवस्थापन (कुटुंबस्तरावर), परसबाग, पाझरखड्डा, शोषखड्डा याद्वारे घरगुती स्तरावर सांडपाणी व्यवस्थापन घर किंवा घराच्या परिसरातच करणे. कुटुंबस्तरावरील प्रत्येक घटकाचे शास्त्रशुद्ध पध्दतीने व्यवस्थापन करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात स्वच्छ माझे अंगण अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या कुटुंबांना दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी श्रीफळ, पुष्प आणि प्रशस्तीपत्र देवून ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे. तरी या अभियानात जिल्हा वासियांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी केले आहे. अभियान अंमलबजावणी कालावधीचे टप्पे- अभियान कालावधी: दि. १ ते दि. २५ सप्टेंबर २०२४, पडताळणी कालावधी: दि. २६ ते दि.३० सप्टेंबर २०२४,पात्र कुटुंबांना लेखी स्वरुपात निमंत्रण देणे दि.०१ ऑक्टोबर २०२४, प्रशस्तीपत्र वितरण दि.०२ ऑक्टोबर २०२४. असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा.व.स्व) यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'