अवैध वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागांची कारवाई
सिंधुदुर्गनगरी, दि.4 (जि.मा.का.): गणेश उत्सवच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सीमा तपासणी नाका इन्सुली कार्यालयाची अवैध मद्य वाहतूकीवर मोठी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक यांनी दिली आहे.
निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सीमा तपासणी नाका इन्सुली पथकाने मिळालेल्या माहितीनुसार गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर, सीमा तपासणी नाका इन्सुली, कार्यालयासमोर, संशयित वाहनांची तपासणी करीत असताना 4 सप्टेंबर रोजी पहाटे 06.15 वाजेच्या सुमारास गोवा राज्यातून मुंबईच्या दिशेने जाणारे अशोक लेलँड सहाचाकी वाहन क्र. DD-01-F-9083 ची तपासणी केली असता वाहनामध्ये गोवा बनावटीचे विदेशी मद्याचे रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्कीचे एकुण 700 बॉक्स मिळून आले.
या प्रकरणी वाहन चालक कुंदन, वय 26 वर्षे, रा. धार, मध्यप्रदेश व टोनी मोरोइएस वय 48 वर्षे, रा. मडगाव, गोवा यांना ताब्यात घेण्यात आले व त्यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्यामध्ये मद्यसाठ्याची किंमत रु.33,66,000/- व वाहनाची अं. किं. रु. 17,00,000/- व एक विवो कंपनीचा मोबाईल अं.किं. रु.12,000/- असा एकुण अंदाजे रु.50,72,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शना खाली प्रभारी निरीक्षक प्रदीप रास्कर,दुय्यम निरीक्षक विवेक कदम, दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, दिपक वायदंडे,जवान, प्रसाद माळी जवान व रणजीत शिंदे, जवान नि. वाहन चालक, जगन चव्हाण, जवान नि.वा. चालक यांनी केली. या प्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे हे करीत आहेत.
००००००००
Comments
Post a Comment