राजस्थानमधील मजुरांना नोंदणी करण्याचे आवाहन /जिल्ह्यातील आणखी एक रुग्ण कोरोना मुक्त - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी


राजस्थानमधील मजुरांना नोंदणी करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 21 - लॉकडाऊन मुळे जिल्ह्यात अडकलेल्या  राजस्थानमधील नागरिकांना त्यांच्या गावी जाता यावे, यासाठी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने राजस्थानसाठी श्रमिक विशेष रेल्वे सोडण्याचे प्रस्तावित आहे. तरी जिल्ह्यात अडकलेल्या राजस्थानातील कामगार, मजूर, विद्यार्थी, व्यापारी अथवा अन्य व्यक्ती यांनी त्यांच्या राज्यात जाण्यासाठी आपली नावे संबंधित तालुक्यांच्या तहसिलदारांकडे दिनांक 22 मे 2020 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत नोंदवावीत असे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे.
या प्रवाशांना त्यांच्या तालुक्यातील बस स्थानकावरुन वैद्यकीय तपासणी करुन एस.टी. बसने सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकावर आणण्यात येणार आहे. त्यांच्या या प्रवासाची सोय मोफत करण्यात येणार आहे. तसेच रेल्वे प्रवासही मोफत असणार आहे. तरी राजस्थानातील जे नागरिक त्यांच्या मुळ गावी जाऊ इच्छितात त्यांनी त्वरीत त्यांची नोंदणी संबंधीत तहसिलदारांकडे करावी असेही आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे.
00000

जिल्ह्यातील आणखी एक रुग्ण कोरोना मुक्त
-         जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 21 - वाडा, देवगड येथील महिलेचा ( जिल्ह्यातील पाचवा कोरोना बाधीत रुग्ण ) कोरोनाचा अहवाल औषधोपचारांनंतर फेरतपासणीमध्ये निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे आज या महिलेस जिल्हा सामान्य रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
जिल्ह्यातील सहाव्या, सातव्या आणि आठव्या कोरोना बाधीत रुग्णाच्या अतिजोखमीच्या संपर्कात एकूण 51 व्यक्ती आल्या होत्या. यापैकी 40 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 11 व्यक्तींचे अहवाल प्रलंबीत आहेत.
जिल्ह्यात एकूण 1 हजार 254 व्यक्ती अलगीकरणात आहेत. त्या पैकी 886 व्यक्तींना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले असून 368 व्यक्ती या संस्थात्मक अलगीकरणात आहेत. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 1 हजार 228 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 हजार 80 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 8 अहवाल पॉजिटीव्ह आले असून उर्वरीत 1 हजार 72 अहवाल निगेटीव्ह आले आहेत.  अजून 148 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 105 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 55 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये, 37 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटर मध्ये, 13 रुग्ण कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी 5 हजार 206 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात आढळलेल्या 8 कोरोना बाधीत रुग्णांपैकी 3 रुग्ण विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून 5 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.
परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अखेर एकूण 33 हजार 447 व्यक्ती दाखल झाल्या आहेत.
00000


Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'