लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात एकूण 11 हजार 426 मे.टन धान्य वाटप - जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते
लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात
एकूण 11 हजार 426 मे.टन धान्य वाटप
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 28 – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा उपाय म्हणून देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. या लॉकडाऊनमुळे समाजातील आर्थिक मागास वर्गात मोठा फटका बसला. या कठीण परिस्थितीमध्ये त्यांना अन्न धान्याचा तुटवडा भासू नये म्हणून राज्य शासनाने मोठ्या प्रमाणावर धान्य वाटपाचा निर्णय घेतला. त्यामध्ये अंत्योदय, प्राधान्य कुटुंब यांना नियमित मिळणाऱ्या धान्या व्यतिरिक्त 5 किलो प्रती व्यक्ती मोफत धान्य वाटप करण्यात आले. केशरी शिधापत्रिका धारकांनाही धान्य वितरण करण्यात आले. या सर्व गटातील कुटुंबांना जिल्ह्यात एकूण 11 हजार 426 मे. टन धान्याचे वाटप एप्रिल व मे या दोन महिन्यात करण्यात आले आहे.
लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यापार, वाहतूक सर्वच बंद झालेले. बांधकामे बंद पडलेली. त्यामुळे हाताला काम नाही, काम नसल्यामुळे मजुरी नाही. मजुरी नसल्यामुळे घरात खायचे काय, समाजातील एक फार मोठा घटक अशा अडचणीत सापडला होता. हातावर पोट असणारा हा वर्ग, रोजचे काम करायचे व मिळेल त्या मजुरीतून घर चालवायचे असा त्यांचा दिनक्रम. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात या वर्गावर उपासमारीची वेळ आली होती. राज्यातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही असे शासनाचे धोरण होते. त्या अनुषंगाने शासनाने मोफत धान्य वाटपाचा निर्णय घेतला. अंत्योदय लाभार्थी व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना नियमित धान्य वितरीत करण्यात येत होते. पण, लॉकडाऊनच्या काळात कोणतीही अडचण उद्भवू नये म्हणून शासनाने प्रतिव्यक्ती 5 किलो मोफत धान्य देण्याचे धोरण निश्चित केले.
या धोरणाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3 हजार 345 मे. टन मोफत धान्याचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये प्राधान्य कुटुंब लाभार्थींना 2 हजार 920 मे.टन आणि अंत्योदय लाभार्थींना 425 मे.टन धान्य वाटप झाले. तसेच केशरी शिधापत्रिका धारकांनाही गहू व तांदूळ वाटपाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील 35 हजार 406 केशरी शिधापत्रिका धारकांना 250 मे.टन तांदूळ, 375 मे. टन गहू असे एकूण 625 मे.टन धान्य वाटप करण्यात आले. हे सर्व धान्य वाटप मे महिन्यामध्ये झाले आहे.
एप्रिल महिन्यामध्ये प्राधान्य कुटुंब लाभार्थींना एकूण 2 हजार 776 मे.टन, तर मे महिन्यामध्ये 3 हजार 116 मे.टन धान्य वाटप झाले. तर अंत्योदय लाभार्थींना एप्रिलमध्ये 772 मे.टन आणि मे महिन्यामध्ये 792 मे टन धान्याचे वाटप करण्यात आले.
सध्या जिल्ह्यामध्ये धान्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून त्यामध्ये तांदूळ 4 हजार 242 मे.टन, गहू – 1 हजार 593, तुरडाळ – 34, चणाडाळ – 64, साखर – 18 मे.टन या प्रमाणे साठा उपलब्ध आहे.
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकेलेल्या मजूर, कामगार आणि बेघरांसाठी शिभोजन थाळीच्या माध्यमातून भोजनाची व्यवस्था करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला. त्याअनुषंगाने जिल्ह्यात 12 शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आली. त्यातील 2 शिवभोजन केंद्र ही जानेवारीमध्येच सुरू करण्यात आली होती. तर 10 शिवभोजन केंद्र ही लॉकडाऊनच्या काळात नवीन शासन धोरणानुसार सुरू करण्यात आली. या सर्व केंद्रांच्या माध्यमातून 750 थाळ्यांचा इष्टांक जिल्ह्याने पूर्ण केला आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये बेघर, मजूर, कामगार यांच्यासाठी धान्याची कोणतीही कमतरता भासू नये म्हणून भारतीय अन्न महामंडळाकडे 50 मे टन तांदळाची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यामध्ये केरोसिनचा पुरवठाही सुरळीत सुरू आहे. माहे मे मध्ये जिल्ह्यात एखूण 132 कि.ली. केरोसिनचा साठा मंजूर करण्यात आला आहे. तसेच येणारा पावसाळ्याचा काळ पाहता जूनमध्येही 132 कि.ली. केरोसीनचा साठा मंजूर करण्यात आला आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 69 हजार 399 एलपीजी गॅस धारक असून त्याचा पुरवठाही सुरळीतपणे सुरू असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी सांगितले.
00000

Comments
Post a Comment