कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यातील संभाव्य आपत्ती बाबत सज्ज रहा - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर पावसाळ्यातील संभाव्य आपत्ती बाबत सज्ज रहा
-
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी,
(जि.मा.का) दि.18 – कोरोनाच्या संकटाच्या
पार्श्वभूमीवर पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व संबंधीत
विभागांनी साधन सामुग्रीसह सज्ज रहावे. रेल्वे, रस्ते वाहतूक, महामार्गाची अपूर्ण
कामे त्वरीत पूर्ण करावीत अशा सूचना
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी येथील जिल्हा नियोजन समितीच्या जुन्या सभागृहामध्ये
आयोजित केलेल्या मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत केल्या.
याबैठकीस मुख्य कार्यकारी
अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपविभागीय अधिकारी सुशांत
खांडेकर, वंदना खरमाळे, वैशाली राजमाने तसेच शासकीय व जिल्हा परिषदेचे सर्व
संबंधित खाते प्रमुख उपस्थित होते.
प्रत्येक तालुक्याच्या
तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या त्वरीत बैठका घेऊन आपत्ती व्यवस्थापन
आराखडा अद्ययावत करावा, सर्व संबंधित विभागांनी नियंत्रण कक्ष 1 जून पासून
कार्यान्वीत करावा, घाट मार्गावर कोसळणाऱ्या दर्डींबाबतची माहिती तातडीने मिळावी व
त्या हटवता याव्यात, तसेच रस्त्यावर पडणारी झाडे, मुख्यतः आंबोली घाटामध्ये,
त्वरीत हटवता यावीत यासाठी महसूल, वन व सार्वजनिक बांधकाम विभागांनी समन्वय
ठेवावा. शोध व बचाव साहित्य अद्ययावत ठेवावे. आरोग्य विभागाने पाणी स्वच्छतेसाठी
टी.सी.एल साठा आवश्यक तरतूद करावी तसेच पावसाळ्यातील साथरोग नियंत्रणाबाबत दक्षता
घ्यावी, स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. पुरामुळे दुषीत
होणाऱ्या पाणीसाठ्यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठीची यंत्रणा सज्ज ठेवावी. वीज
पुरवठा अव्याहत सुरू राहण्याबाबत संबंधित विभागाने दक्षता घ्यावी, राष्ट्रीय
महामार्ग विभागाने अपूर्ण कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, संभाव्य पूर
परिसरातील नागरिकांना निवाऱ्यासाठीची यंत्रणा तयार ठेवावी, पावसाळा कालावधीत
पाटबंधारे विभागाने धरणातील पाण्याच्या विसर्गाची माहिती विहित वेळेत नदी काठच्या
गावांना द्यावी, विशेषतः तिलारी धरण क्षेत्रामध्ये अधिकारी व कर्मचारी यांनी सतर्क
रहावे. जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठा व विसर्ग यांची दैनंदिन माहिती महसूल
विभागास व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षास कळवावी आदी सूचना के.मंजुलक्ष्मी यांनी
या बैठकीत केल्या. शेवटी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या प्रमुख राजश्री सामंत यांनी
आभार मानले.
·
सोबत फोटो जोडला आहे.
00000

Comments
Post a Comment