अतिजोखमीच्या संपर्कातील 59 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी रवाना - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

अतिजोखमीच्या संपर्कातील 59 व्यक्तींचे
नमुने तपासणीसाठी रवाना
                                                - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 26 – जिल्ह्यात आढळलेल्या नवीन 9 कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचा शोध पूर्ण झाला आहे. त्यातील अतीजोखमीच्या संपर्कातील 59 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर कमी जोखमीच्या संपर्कातील सर्व व्यक्तींना अलगीकरणात ठेवण्यात आले आहेत.           
जिल्ह्यात सध्या 4 कंटेन्मेंट झोन आहेत. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील डामरे, वैभववाडी तालुक्यातील नाधवडे, मालवण तालुक्यातील हिवेळे आणि कुडाळ तालुक्यातील पणदूर या गावांचा समावेश आहे. पणदूर कंटेन्मेंट झोनमध्ये 8 पथकांनी  282 कुटुंबातील 1 हजार 341 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. तर डामरे बाधीत क्षेत्रात एका पथकाने 33 कुटुंबातील 146 व्यक्ती, हिवाळे बाधीत क्षेत्रात 3 पथकांमार्फत 88 घरांमधील 388 व्यक्ती, नाधवडे बाधीत क्षेत्रात 4 पथकांनी 130 घरांमधील 1 हजार 341 व्यक्तींचे सर्वेक्षण केले आहे. या सर्व कंटेन्मेंट झोनमध्ये एकूण 16 पथकांच्या माध्यामातून 533 घरांमधील 2 हजार 393 लोकसंख्येचा सर्वे करण्यात आला. यामध्ये कोणालाही कोरोना सदृष्य लक्षणे आढळून आली नाहीत.
जिल्ह्यात एकूण 24 हजार 89 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्या पैकी 451 व्यक्ती या शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. तर 23 हजार 638 व्यक्तींना गावपातळीवरील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर जिल्ह्यात प्रवेश केलेल्या  इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 1 हजार 504 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 हजार 182 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 17 अहवाल पॉजिटीव्ह आले असून उर्वरीत 1 हजार 165 अहवाल निगेटीव्ह आले आहेत.  अजून 322 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 101 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 74 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये, 27 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी 4 हजार 733 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण 17 कोरोना बाधीत रुग्णांपैकी 7 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सध्या 10 रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
00000


Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'