महासंस्कृती महोत्सवाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन सांस्कृतिक कार्यक्रमातून मानसिक आनंद -पालकमंत्री रविंद्र चव्हाण
सिंधुदुर्गनगरी, दि.6 (जि.मा.का): सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सर्वानाच सुखद क्षणाची आवश्यकता असते. असा आनंद काही प्रमाणात संगीताच्या माध्यमातून प्राप्त होत असल्याने महासंस्कृती महोत्सवासारखे महोत्सव सातत्याने होणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले.
शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित 'महासंस्कृती महोत्सव' चे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, आमदार नितेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, माजी आमदार राजन तेली, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद परब, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, देवगड तहसीलदार तथा परिविक्षाधीन जिल्हाधिकारी विशाल खत्री, पी एम विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रांताधिकारी अविशकुमार सोनुने आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'महासंस्कृती' महोत्सवाचे आयोजन डॉ. स्वार हॉस्पीटल समोरील मैदान, सावंतवाडी येथे दि.6 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2024 या पाच दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेले आहे.
पालकमंत्री पुढे म्हणाले, कोकणची भूमी ही जशी हिरव्यागार निसर्गसौंदर्याने नटलेली आहे तशीच ती लोककला आणि साहित्यानेही नटलेली आहे. आपल्या जिल्ह्याला मोठी सांस्कृतिक व साहित्यिक परंपरा लाभलेली आहे. आपला जिल्हा लोकसंस्कृतीमुळे प्रसिध्द आहे. कला, साहित्य आणि निसर्गसंपन्न आविष्कार म्हणजे आपला सिंधुदुर्ग जिल्हा आहे.
आपल्या रूढी,परंपरा आणि संस्कृती एका पिढीतुन दुसऱ्या पिढीकडे वारसाने जात असतात. अशा रूढी, परंपरा आणि संस्कृती जपणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, त्यांचे कार्य पुढील पिढीपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या महोत्सवातून त्यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहचणार आहे. तसेच 'आयोध्या ' ह्या नाट्याचे प्रयोग देखील पंचक्रोशीत घ्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर म्हणाले, शासन अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत आहे. नुकताच छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० राज्याभिषेक रायगडावर पार पडला. सांस्कृतिक महोत्सवामधून कलाकारांना व्यासपीठ मिळते असेही ते म्हणाले.
आमदार नितेश राणे म्हणाले, या महोत्सवाच्या माध्यमातून जिल्हा वासियांना कलेची मेजवानी मिळाली आहे. हा खूप चांगला महोत्सव आहे आणि यातून अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळणार आहे. असे महोत्सव सातत्याने होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी किशोर तावडे महोत्सवाविषयी माहिती देताना म्हणाले, या महोत्सवादरम्यान महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातील कलाप्रकार आपल्या जिल्ह्यात सादर होणार असल्याने आपल्या जिल्ह्यातील रसिकांना महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातील कला व संस्कृतीची ओळख होणार आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध कलाकारांसाठी नेहमीच व्यासपीठ उपलब्ध होत असते, मात्र गाव खेड्यातील होतकरू कलाकारांना व्यासपीठाच्या संधी कमी निर्माण होतात. म्हणून आपण या महोत्सवादरम्यान स्थानिक लोककला आणि कलाकरांना प्राधान्य दिलेले आहे असेही ते म्हणाले.
आभार मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी मानले.
०००००
--
Comments
Post a Comment