बलिदानाची अमर गाथा ‘हिंद-दी-चादर’ – श्री गुरु तेग बहादूर साहिब

भारतीय इतिहासाच्या विस्तीर्ण पटावर काही महान व्यक्तिमत्त्वे अशी कोरली गेली आहेत, ज्यांचे जीवन आणि बलिदान काळाच्या मर्यादा ओलांडून मानवतेसाठी दीपस्तंभ ठरले आहे. अशाच तेजस्वी ताऱ्यांपैकी एक म्हणजे शीख धर्माचे नववे गुरु, ‘हिंद-दी-चादर’ म्हणून गौरविले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब. त्यांचे जीवन हे केवळ धार्मिक नेतृत्वाचे उदाहरण नसून, मानवी स्वातंत्र्य, आत्मसन्मान, विवेक आणि सत्यासाठी दिलेल्या सर्वोच्च त्यागाचे अमर प्रतीक आहे. श्री गुरु तेग बहादूर साहिब यांनी दिलेले बलिदान कोणत्याही एका धर्माच्या संरक्षणापुरते मर्यादित नव्हते. ते होते मानवतेच्या सार्वत्रिक मूल्यांचे रक्षण. “धर्माचे रक्षण म्हणजे मानवतेचे रक्षण” हा संदेश त्यांनी केवळ शब्दांत नव्हे, तर आपल्या जीवनातून आणि मृत्यूतून जगासमोर मांडला. म्हणूनच त्यांचे बलिदान आजही संपूर्ण देशासाठी, आणि जगासाठी, प्रेरणादायी ठरते. सत्य आणि मानवतेच्या रक्षणासाठी श्री गुरु तेग बहादुर साहिब यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी इतरांच्या हक्कांसाठी उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यांचे बलिदान कोणाविरुद्ध नव्हते, तर संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी होते. त्यामुळेच संपूर्ण देशाने त्यांना प्रेमाने आणि सन्मानाने “हिंद की चादर” ही गौरवशाली उपाधी दिली. त्यांचे बलिदान हे धर्मस्वातंत्र्य, सहिष्णुता आणि मानवतेच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य सतराव्या शतकातील भारत हा धार्मिक असहिष्णुतेचा, अत्याचारांचा आणि जबरदस्तीच्या धर्मांतराचा काळ होता. विशेषतः काश्मिरी पंडितांवर होत असलेल्या अन्यायाने संपूर्ण समाज अस्वस्थ झाला होता. भयग्रस्त आणि असहाय्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी श्री गुरु तेग बहादूर साहिब स्वतः पुढे आले. विशेष म्हणजे, हा संघर्ष त्यांच्या स्वतःच्या धर्मापुरता मर्यादित नव्हता. त्यांनी इतर धर्मीयांच्या श्रद्धा आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आपले जीवन पणाला लावले. सन 1675 मध्ये दिल्लीत त्यांनी स्वीकारलेले शहीदत्व हे इतिहासातील एक अद्वितीय पर्व ठरले. दिल्लीच्या चांदणी चौकात सत्तेच्या क्रूरतेसमोर न झुकता, तलवारीच्या भीतीला न जुमानता त्यांनी सत्याची आणि विवेकाची बाजू धरली. शरीर नष्ट झाले, पण विचार अमर झाले. त्यांच्या शहिदीने हे स्पष्ट केले की, माणसाच्या मूल्यांना, श्रद्धेला आणि विचारांना कधीही कैद करता येत नाही. आजच्या काळात अधिक सुसंगत ठरणारे विचार आजचा समाज अनेकदा मतभेद, असहिष्णुता आणि स्वार्थाने ग्रासलेला दिसतो. अशा वेळी श्री गुरु तेग बहादूर साहिब यांचे विचार अधिकच मार्गदर्शक ठरतात. धार्मिक सहिष्णुता, परस्पर आदर, मानवाधिकार आणि संविधानिक मूल्यांची जपणूक या संकल्पनांना त्यांनी आपल्या बलिदानातून बळ दिले. त्यांचे जीवन सांगते की, खरा धर्म हा माणसाला माणसाशी जोडतो, तो द्वेष शिकवत नाही. ३५० व्या शहीदी शताब्दीचे स्मरण सन १६७५ मधील त्या महान बलिदानाला आता ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या ३५० व्या शहीदी शताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण देशभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून गुरु तेग बहादूर साहिब यांच्या जीवनकार्याचा गौरव केला जात आहे. व्याख्याने, परिसंवाद, शैक्षणिक कार्यक्रम, धार्मिक प्रवचने आणि सांस्कृतिक सादरीकरणांच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा प्रसार केला जात आहे. हे उपक्रम केवळ इतिहासाचे स्मरण नाहीत, तर नव्या पिढीच्या मनात मूल्यांची बीजे रोवण्याचा एक सशक्त प्रयत्न आहेत. नांदेडमध्ये भव्य शहिदी समागम ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या त्याग, बलिदान आणि मानवतेच्या महान कार्याला अभिवादन करण्यासाठी ३५० वा शहिदी समागम २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड शहरात आयोजित करण्यात आला आहे. या समागमात देश-विदेशातील भाविक, विविध समाज व संप्रदाय एकत्र येणार असून, हा कार्यक्रम धार्मिक एकात्मता, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक ठरणार आहे. अमर वारसा इतिहास साक्ष देतो की, जे लोक सत्यासाठी उभे राहतात, ते शरीराने जरी नष्ट झाले तरी त्यांच्या विचारांची ज्योत कधीच विझत नाही. ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब यांचे बलिदान भारतीय संस्कृतीच्या आत्म्यात कायमचे कोरले गेले आहे. हा वारसा आपण जपला, तरच समाज अधिक न्याय्य, समतावादी आणि मानवतावादी बनेल. हीच त्यांच्या महान बलिदानाला खरी आदरांजली ठरेल. संकलन- जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग 0000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'