रब्बी पिकांच्या ई-पीक पाहणीसाठी मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी दिनांक 19 (जिमाका) :- जिल्ह्यातील रब्बी हंगाम 2025-26 मधील पिकांची अचूक नोंद सातबारा उताऱ्यावर होण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवताना तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी 'ई-पीक पाहणी' प्रक्रियेला शासनाने मुदतवाढ दिली आहे. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या या डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) प्रणाली अंतर्गत, रब्बी पिकांची नोंदणी 1 डिसेंबर 2025 पासून सुरू झाली असून ती 14 जानेवारी 2026 पर्यंत होती. आता शेतकरी स्तरावरून स्वतःच्या मोबाईलद्वारे ही नोंदणी करण्यासाठी 24 जानेवारी 2026 पर्यंत अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. तरी जिल्ह्यतील शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी चा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी दिली आहे.
शासनाचा ई-पीक पाहणी प्रकल्प दिनांक 15 ऑगस्ट 2021 पासून संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या प्रकल्पात सुधारणा करून, खरीप व रब्बी हंगाम 2024 पासून पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सर्व प्रणालीद्वारे संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे. तथापि, शेतकऱ्यांनी सहाय्यकांवर अवलंबून न राहता शक्य तितकी पीक पाहणी स्वतःच पूर्ण करावी. पीक पाहणी दरम्यान काही अडचणी आल्यास, आपल्या गावासाठी नेमणूक करण्यात आलेले पीक पाहणी सहाय्यक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपलब्ध असतील, तरी सर्व शेतकरी बांधवांनी, रब्बी 2025 ची पीक पाहणी दिनांक 24 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करावी.
००००००
Comments
Post a Comment