नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या सद्यंस्थितीत धोका नाही --- कार्यकारी अभियंता म. वि. म्याकल / कृषी विभागाकडून कोकण विभागाला पुरेसा रासायनिक खताचा साठा / मौजे कुडाळ येथील करंदिकर चाळ व लक्ष्मीवाडी येथे कंटेन्मेंट झोन
नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या सद्यंस्थितीत धोका नाही
--- कार्यकारी अभियंता म. वि. म्याकल
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 17 : नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या कामकाजाबाबतची माहिती दि. 11 जुलै रोजी 'न्यूज-18 लोकमत' या वृत्त वाहिनीने दाखविली. त्यानंतर दि. 12 व 14 जुलै 2020 रोजी विविध वर्तमानपत्रामध्ये नरडवे धरणाच्या बांधाला भगदाडे पडली व निकृष्ट दर्जाचे कामकाज अशा आशयाच्या बातम्याच्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याबाबतचा खुलासा लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता म. वि. म्याकल यांनी खालीलप्रमाणे दिला आहे.
सन 2019-20 च्या हंगामातील धरणाचे बांधकाम डिसेंबर 2019 पासून सुरु करण्यात आले होते. माती कामासोबतच मातीकामाच्या वरिल खाली उतारांची दबाई करुन त्याठिकाणी अश्मपटलाचे काम पूर्ण करुन रॉकटोसह उतार (Slope) संरक्षित करण्याचे नियोजित होते. कोविड-19 याविषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित केलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे खबरदारीचा उपाय म्हणून दि. 23 मार्च 2020 पासून नरडवे धरणाचे बांधकाम बंद करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात जलसंपदा विभागाच्या प्राप्त सुचनेनुसार दि. 1 ते 4 एप्रिल 2020 या कालावधीत धरणाचे काम करण्यात आले. परंतु कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर काम पुनःश्च बंद करण्यात आले होते.
कोकण विभागामधील अति पर्जन्यमानाचा विचार करता, हंगामात झालेल्या मातीकामाचे नुकसान होऊ नये म्हणून मान्सून पूर्व कामे करणे आवश्यक असल्याचे दि. 5 मे 2020 रोजी पासून धरणाच्या झालेल्या माती कामाच्या भरावाला वरिल व खालीलबाजूला मातीचे बंड घालणे, पृष्ठ भागावर पावसाचे पाणी साचू न राहता त्याचा निचरा होण्यासाठी ठिकठिकाणी उघडी गटारे मारणे, नरडवे, जांभळगाव व महम्मदवाडी रस्त्याच्या दुतर्फा खोल गटारे मारणे, माती वाहतूक करणाऱ्या गाड्यांसाठी तयार केलेल्या रस्त्यांच्या बाजूस पाणी वाहून नेण्यासाठी उघडी गटारे तयार करण्यासाठी बुडीतक्षेत्रातील जांभळगाव, महम्मदवाडी व घोलाणवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आवश्यक त्याठिकाणी मुरुम घालून पावसाळ्यापूर्वी सुरक्षित कामांना सुरुवात करुन मे 2020 अखेर ही कामे पूर्ण करण्यात आली.
जून महिन्यापासून सुरु झालेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा गटारांमार्फत योग्यरित्या करण्यात आला होता. तथापि अतिमुसळधार पावसामुळे माती वाहतुक करणाऱ्या गाड्यांसाठी तयार केलेल्या रस्त्याच्या बाजुकडील गटारांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पावसाचे पाणी वाहून आल्यामुळे गटारे रुंदावली आहेत. तसेच ब्रेमच्या कडेला करण्यात आलेल्या गटरमध्ये पावसाच्या पाण्यामुळे माती वाहून गटरे तुंबल्यामुळे पाणी गटरच्या वहन क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने थेट ढिसाळमातीच्या उतारावरुन पावसाचे पाणी खालील गटारात मिसळून पुढे नाल्यास मिळाले. याप्रकारे वाहून गेलेल्या पाण्यामुळे प्रकल्पग्रस्तांची ये-जा होणा-या कोणत्याही रस्त्यास बाधा अथवा हानी झालेली नाही. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याकरीता केलेल्या उपाययोजनांतर्गत करण्यात आले आहे. तसेच धरणाच्या माती कामाच्या बांधकामाबाबत व गुणवत्तेबाबत वेळोवेळी वरीष्ठ अधिकारी यांच्यामार्फत व गुणनियंत्रण विभागामार्फत क्षेत्रीय भेटींद्वारे निरीक्षण केले जाते. निरीक्षण भेटीतील प्राप्त सुचनांची पुर्तता करुन पुढील काम प्रगतीत ठेवले आहे. तसेच वापरण्यात येणा-या साहित्यांची तपासणी गुणनियंत्रण प्रयोग शाळेत व क्षेत्रीय प्रयोगशाळेत करुन त्याबाबतचे निष्कर्ष उपलब्ध करुन विहीत मानकांशी पडताळले असून ते समाधानकारक आहेत. मंजूर संकल्पना, रेखाचित्र व विनिर्दिष्टांनुसार प्रकल्पांतर्गत विविध घटकांचे बांधकामे केली जात असून, धरणास कोणत्याही प्रकारचा धोका संभवत नाही.
0000
कृषी विभागाकडून कोकण विभागाला
पुरेसा रासायनिक खताचा साठा
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 17 : चालू खरीप हंगामात कोकण विभागात- ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुख्यत: भात व फळपिकांचे क्षेत्र असून खरीप हंगामासाठी लागणाऱ्या कृषी निविष्ठा, त्यामध्ये बियाणे व रासायनिक खतांची उपलब्धता सर्व जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहितीझाली आहे. कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील यांनी दिली.
कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर त्यांच्या मागणीनुसार जुलै महिन्याच्या 15 तारखेपर्यंत युरिया खताची मागणी 31430 मे. टन एवढी होती त्यानुसार 33858 मे. टन युरियाची उपलब्धता झाली आहे. मंजूर आवंटनापेक्षा 108 टक्के उपलब्धता झाली असून ती शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोच करण्यात आलेली आहे. भात पिकाचे बियाणे 5 एप्रिल पासूनच उपलब्ध होऊन शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार केलेल्या आहेत. माहे जून मध्ये पुरेसा पाऊस झाल्याने रोपांची उगवण चांगली होऊन लागण सुरु झालेली आहे. त्याकरिता लागणारा रासायनिक खताचा साठा कृषी निविष्ठा केंद्रावर उपलब्ध करून शेतकऱ्यांपर्यंत पुरवठा करण्यात आला आहे. कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व निविष्ठा केंद्रांची विशेष तपासणी मोहीम घेऊन सर्व विक्री केंद्रे तपासण्यात आली. विक्री केंद्रामध्ये दर फलक लावणे, मागेल त्याप्रमाणे निविष्ठा देणे व सर्व नोंदी व्यवस्थित ठेवण्याबाबत कडक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोणत्याही विक्रेत्याने जादा दराने खते, बियाणे विकलेले आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाही करण्यात येईल अशा सूचनाही सर्व विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत.
कोकण विभागात, मुख्यत: युरिया, डी.ए.पी. व नत्रयुक्त मिश्रखते जिल्ह्याच्या मागणीनुसार व कृषी आयुक्तालयाने मंजूर केलेल्या आवंटनाप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. कोकण विभागात शेतकऱ्यांना बांधावर बियाणे व खते पुरवठा योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 1200 शेतकरी गटामार्फत 4750 मे. टन आणि 8432 क्विंटल बियाणे बांधावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पालघर जिल्ह्यात 1245 शेतकरी गटामार्फत 6196 मे. टन खते आणि 10945 क्विंटल बियाणे पुरवठा करण्यात आली आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये 2807 शेतकरी गटामार्फत 11898 मे. टन खते आणि 8560 क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात 2376 शेतकरी गटामार्फत 1346 मे. टन खत आणि 2210 क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1918 शेतकरी गटामार्फत 1371 मे. टन खते आणि 5861 क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यामुळे कोकण विभागात एकूण 9546 शेतकरी गटांमार्फत 25561 मे. टन खते आणि 36008 क्विंटल बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
कोकण विभागामध्ये जिल्हास्तर व तालुका स्तरावर भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली असून त्यांच्याद्वारे निविष्ठा विक्रीच्या काळ्या बाजारावर अंकुश ठेवला जात आहे. त्यामुळे कोकण विभागात आतापर्यंत बियाणे उगवणीबाबतच्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी आलेल्या नाहीत, असे कोकण कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
00000
मौजे कुडाळ येथील
करंदिकर चाळ व लक्ष्मीवाडी येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 17 : कुडाळ तालुक्यातील मौजे कुडाळ करंदिकर चाळ व लक्ष्मीवाडी येथील 100 मीटर परिघ क्षेत्रात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सदरचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 30 जुलै 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरीकांना येणे - जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कुडाळ उपविभागीय अधिकारी प्रशांत पानवेकर यांनी दिले आहेत.
00000
Comments
Post a Comment