सावंतवाडी तालुक्यातील मौजे निगुडे मधलीवाडी येथे कंटेन्मेंट झोन / ऑनलाईन व्हर्च्युअल पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 14 जुलैपासून / शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरु

सावंतवाडी तालुक्यातील मौजे निगुडे
मधलीवाडी येथे कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 10 : सावंतवाडी तालुक्यातील मौजे निगुडे मधलीवाडी येथील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सदरचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 23 जुलै 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरीकांना येणे - जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिले आहेत.
00000

ऑनलाईन व्हर्च्युअल
पंडित दीनदयाळ उपाध्याय
रोजगार मेळावा 14 जुलैपासून

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 10 : कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातून कुशल व अकुशल कामगार स्थलांतरीत झाले आहेत. तसेच परराज्यातून व परजिल्ह्यातून नागरिक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यामुळे खाजगी क्षेत्रातील कारखाने, उद्योग, व्यापार, उद्योजक, दुकाने, मॉल्स व इतर व्यवसाय यांना सद्य:स्थितीत मनुष्यबळाचा तुटवडा भासत आहे, ही बाब लक्षात घेऊन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी दिनांक 14 जुलै 2020 ते 17 जुलै 2020 यादरम्यान ऑनलाईन पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या रिक्त पदांची माहिती त्यांच्या लॉगीनने ऑनलाईन पोस्ट करण्याची सुविधा कौशल्य विकास विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in यासंकेत स्थळावर उपलब्ध आहे. उद्योग आस्थापनांना यासंकेतस्थळावर नोंदणी केलेली नाही, परंतु त्यांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे. अशा उद्योजकांनी प्रथम संकेतस्थळावर आपली नोंदणी करुन रिक्त पदे पोस्ट करण्यात यावी. उद्योजकांकडून रिक्तपदे पोस्ट केल्यानंतर जिल्ह्यातील संकेतस्थळावर नोंदणीकृत उमेदवार ऑनलाईन उद्योजकांकडे अर्ज करतील. त्यानंतर त्यांना मुलाखतीसाठी ऑनलाईन तारिख, वेळ व मुलाखत घेऊन अंतिम निवड करु शकतील.
जिल्ह्यातील व अन्य जिल्ह्यातील उद्योजक आणि उमेदवारांनी वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरीच्या संधीची माहिती हवी आहे. तसेच वरिल संकेतस्थळावर नोंदणी केलेली नाही त्या उमेदवारांनी नोकरी साधक (Job Seeker) मध्ये नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी 02362-228835 व 9403350689 या दूरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांकावर त्याचबरोबर sindhudurgrojgar@gmail.com या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.
0000

शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरु

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 10 : शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2020-21 या वर्षापासून पुढील तीन वर्षासाठी सुरु करण्यात येत आहे. या योजनेमार्फत शेतकऱ्यांना बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत पेरणी न होणे, पूर, दुष्काळ, अनियमित पाऊस, भूस्खलन, ढगफुटी, नैसर्गिक आग, वादळ, गारपीट, वीज कोसळणे, काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे नुकसान, खरिप हंगामात अतिवृष्टी, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी पिक विमा योजना राबवून शेतकऱ्यांना त्यांची आर्थिक नुकसान देता येणार आहे, अशी माहिती कोकण विभागाचे विभागीय कृषि सह संचालक यांनी दिली.
कोकण विभागातील शेतकऱ्यांना शासनाकडून नियुक्त केलेल्या विमा कंपनीकडून पिक विमा उतरविण्यात येणार आहे. ही योजना खरिप हंगामातील भात, नाचणी व उडीद या पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रामध्ये राबविण्यात येणार आहे. भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम रु. 45 हजार 500 प्रति हेक्टर एवढी असून भरावयाचा प्रति हेक्टर विमा हप्ता रु. 910 इतका आहे. नाचणी व उडीद पिकासाठी प्रत्येकी विमा संरक्षित रक्कम रु. 20 हजार प्रति हेक्टर एवढी असून, भरावयाचा प्रति हेक्टर विमा हप्ता रु. 400 इतका आहे. गत वर्षात सन 2019 मध्ये कोकण विभागात प्रधानमंत्री पिक योजनेतंर्गत खरिप हंगामात 42 हजार 637 शेतकरी सहभागी झाले असून त्यापैकी 36 हजार 910 शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई पोटी रक्कम रु. 24 कोटी 92 लाख 68 हजार इतकी लाभापोटीची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.
चालू वर्षापासून ही योजना कर्जदार शेतकऱ्यासाठी ऐच्छित करण्यात आली आहे. तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी जवळच्या बँकेमध्ये त्याचप्रमाणे तालुका व गावपातळीवर सुरु करण्यात आलेल्या आपले सरकार या जनसुविधा केंद्रामार्फत पिक विम्याबाबत अर्ज करु शकतील. तसेच सदर योजनेचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहे. त्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपला सात-बारा उतारा, पेरणी घोषणापत्र, आधार कार्ड, भाडेपट्टी करार असल्यास करारनामा, बँक पासबुक प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. शिवाय शेतकऱ्यांनी शासनाच्या पिक विमा संकेतस्थळावरुन किंवा विमा कंपनीच्या संकेतस्थळावरुनही वैयक्तिकरित्या या योजनेत सहभागी होऊ शकतात. या योजनेत शेतकऱ्यांनी जास्तीत जास्तपणे सहभागी व्हावे, तसेच काही अडचण निर्माण झाल्यास जवच्या कृषि विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'