जिल्ह्यातील सर्व महत्वाच्या रस्त्यांवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर 93 ठिकाणी 280 सीसीटीव्ही कॅमेरे / कणकवली तालुक्यातील वागदे व जानवली येथे कंटेन्मेंट झोन / जिल्ह्यातील उद्योग व कंपन्यांना आवाहन

जिल्ह्यातील सर्व महत्वाच्या रस्त्यांवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर
93 ठिकाणी 280 सीसीटीव्ही कॅमेरे

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 27 – जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे. एकूण चार कोटी 98 लक्ष रुपये खर्चून जिल्ह्यातील 93 ठिकाणी 280 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या प्रयत्नातून ही सुरक्षीतता प्रत्यक्षात आली आहे.
संपूर्ण जिल्हाभरात लावण्यात आलेल्या या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आता जिल्हा अधिक सुरक्षीत झाला आहे. तसेच यामुळे पर्यटन व्यवसाय वाढीसाठी मदत होणार आहे. जिल्ह्यातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होणार आहे. महिला व बालकांवरील अत्याचारांना आळा बसण्यास मदत होणार आहे. रीमोट अनाउसींगमुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये मनुष्य हानी टाळता येणार आहे. महामार्ग व शहरातील रस्त्यांवरील वाहनांना शिस्त लागेल, हरवलेल्या वस्तू व व्यक्ती यांचा मागोवा घेणे सोपे होणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या प्रकल्पाविषयी माहिती देताना सांगितले.
या प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील 93 ठिकाणी 280 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, साटेली – भेडशी, बांदा, देवगड – जामसंडे, वैभववाडी, मालवण अशा शहातील एकूण 59 ठिकाणी कॅमेरे आहेत. तर म्हापण, परुळे, पाट, आंबोली, मळगाव, वेताळ बांबर्डे, पणदूर, कसाल, आचरा, कुणकेश्वर, शिरगाव, नांदगाव, भूईबाडवा, पडेल या 18 ठिकाणीही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील 6 रेल्वे स्टेशन, 3 जेटी, 7 तपासणी नाके हे ही आता सीसीटीव्हीच्या नजरेत आले आहेत. बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांपैकी 210 कॅमेरे हे 4 मेगापीक्सेल नाईटव्हीजन बुलेट प्रकारातील आहेत. तर 30 कॅमेरे हे 4 मेगापीक्सल रंगीत नाईटव्हीजन बुलेट कॅमेरे प्रकारातील आहेत. तर स्वयंचलित वाहन क्रमांक ओळखणारे नाईटव्हीजन कॅमेरे 40 आहेत. या संपूर्ण प्रकल्पाची साठवण क्षमता सहाशे टेराबाईट्स असून 45 दिवसांपर्यंत साठवण करता येते. जिल्हा नियंत्रण कक्ष तसेच पोलीस ठाणे पातळीवर लाईव्ह कॅमेराद्वारे देखरेख व प्लेबॅकची सुविधा. प्रत्येक कॅमेऱ्यामध्ये अंतर्गत संचय सुविधा तसेच पॉवर बॅकअप आहेत. जिल्हा नियंत्रण कक्ष येथे 22 फूट रुंद हाय डेफिनेशन व्हीडिओ वॉल आणि व्हीडिओ व्यवस्थापन सर्व्हर, स्टोरेज सुविधेसह सुसज्ज आहे. सर्व सीसीटीव्ही हे सौर ऊर्जेवर चालणारे आहेत. तसेच सर्व यंत्रणा ही हायस्पीड फायबर ऑप्टिक्स नेटवर्कने जोडलेली आहे. 4 मेगापिक्सल कॅमेरे असल्यामुळे रस्त्यावरील सर्व हालचालींचे स्पष्ट चित्रण करणे शक्य होणार आहे.
या प्रणालीचे लोकार्पण सोहळा उद्या दिनांक 28 जुलै 2020 रोजी सायंकाळी 4 वा. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.

00000

कणकवली तालुक्यातील वागदे व जानवली येथे कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनरी ( जि.मा.का) दि. 27 – कणकवली तालुक्यातील मौजे वागदे – सावरवाडी येथील साईपार्क अपार्टमेंट, 11 फ्लॅट, 11 कुटुंबे व 36 लोकसंख्येचा 50 मीटरचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे. तर मौजे जानवली येथील 1 घर, 1 कुटंब व 4 लोकसंख्येचा समावेश असणारा 50 मीटरचा परिसरही कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 8 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 2 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे – जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कणकवलीच्या उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.

00000

जिल्ह्यातील उद्योग व कंपन्यांना आवाहन

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का.) दि. 27 – जिल्ह्यातील उद्योगांमध्ये तसेच कंपनीमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी व कायमस्वरूपी कामगारांना कोरोनाची लागण झाल्यास, त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च संबंधीत कंपनीने करावयाचा आहे. तसेच कामगारांच्या सुरक्षेसाठी काम करताना मास्क, सुरक्षीत अंतर ठेवणे, हातमोजे वापरणे या बाबत कंपन्यांनी दक्षता घ्यावी असे आवाहन आर.बी. टेंबुलकर, सरकारी कामगार अधिकारी यांनी केले आहे.

00000



Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'