कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात 8 जुलै पर्यंत कडक लॉकडाऊन - जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी
8 जुलै पर्यंत कडक लॉकडाऊन
-
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का)
दि. 01 – जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता
कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक आहे. त्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात 7 दिवसांसाठी प्रतिबंधात्मक
उपाय योजना करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने दिनांक 8 जुलै 2020 रोजी पर्यंत
जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी
दिले आहेत.
या लॉकडाऊनच्या कालावाधीमध्ये पुढील बाबींना
बंदी असणार आहे. कोणालाही या कालावधीत घरा बाहेर पडता येणार नाही. जिल्ह्याच्या
सर्व सीमा बंद राहतील. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व प्रकराची वाहतूक त्यामध्ये दुचाकी,
तीन चाकी, चार चाकी वाहने, रिक्शा, जीप, टॅक्सी, कार, बस बंद राहतील, सर्व आठवडी
बाजार बंद राहतील, अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकाने व आस्थापना वगळता सर्व
दुकाने, आस्थापना बंद राहतील. सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र
येण्यास मनाई राहील. कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी, प्रवासावेळी मास्कचा वापर
बंधनकारक आहे, अत्यावश्यक सेवेसाठी सार्वजनिक ठिकाणी जाणे आवश्यक असल्यास किमान 6
फूटाचे अंतर ठेवावे, दुकानावर एकावेळी 5 पेक्षा जास्त ग्राहक उपस्थित राहणार
नाहीत. मोठ्या प्रमाणावर जमाव जमेल अशी कृती करण्यास प्रतिबंध राहील. सार्वजनिक
ठिकाणी थुंकण्यास, पान, तंबाखू यांच्या सेवनावर तसेच मद्यपानावर बंदी आहे. कामाच्या
ठिकाणी थर्मल स्कॅनर, हात धुण्याचा साबण, सॅनिटायझर हे प्रवेशाच्या ठिकाणी उपलब्ध
ठेवणे हे संबंधीत आस्थापना प्रमुखावर बंधनकारक राहील. कामाच्या ठिकाणी सार्वजनिक वापर असणाऱ्या जागा
सतत निर्जंतुकीकरण कराव्यात.
सदर लॉकडाऊनच्या काळात पुढील सेवा सुरू
राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा, आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाशी संबंधित कार्यालये,
आस्थापना या 100 टक्के अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीसह सुरू राहतील. तर
अन्य शासकीय, निमशासकीय कार्यालये 10 टक्के अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत
सुरू राहतील. पिण्याचा पाणी पुरवठा, सांडपाणी निचरा व्यवस्थापन, स्वच्छता इत्यादी
व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना, सर्व बँका, पोस्टल सेवा, कुरियर सेवा, दूरध्वनी
सेवा व इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या आस्थापना, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आय.टी
आस्थापना, ऑनलाईन शिक्षण, ई- कॉमर्स सेवा, अन्नधान्य, फळे, भाजीपाला, दूध व दुधाचे
पदार्थ, ब्रेड, किराणा माल, सार्वजनिक वितरण व्यवस्था सुरू राहतील. मांस, मासे,
अंडी यांची विक्री करणारी दुकाने बुधवार, शुक्रवार, रविवार व मंगळवारी सुरू
राहतील. रुग्णालये व सर्व वैद्यकीय आस्थापना, औषधालये, पशुवैद्यकीय दवाखाने, देखभाल
केंद्र व पाळीव प्राण्यांच्या पशुवैद्यकीय आस्थापना व दुकाने, सर्व प्रकारचे
उद्योग व्यवसाय व त्यांच्या आस्थापना, ऑईल, गॅस, पेट्रोलियम व ऊर्जा साधने पुरवणाऱ्या
आस्थापना, त्यांची गोदामे व वाहतूक, प्रसार माध्यमे व इलेक्ट्रॉनिक मीडिया, अंत्यविधी
व अंत्ययात्रा यामध्ये 20 व्यक्ती उपस्थित राहू शकतील. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव
होणार नाही अशी उपाययोजना करुन त्यास परवानगी असेल. शासकीय कामे व त्याच्याशी
निगडीत वाहतूक, शेती विषयक कामे, कृषिमाल व कृषि उत्पादने, या संबंधीची आयात,
निर्यात, शीतगृहे, गोदाम सेवा व त्यासाठी आवश्यक वाहतूक, सर्व बंदरे व संबंधीत
सेवा. मद्यविक्री ही फक्त ऑनलाईन सुरू
राहील व घरपोच सेवा सुरू ठेवता येईल. निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानीची पुर्नबांधनी,
पंचनामे, मदत, वाटप, संबंधीच्या आस्थापना, सर्व प्रकारचे उद्योग, व्यवसाय, शेतीमाल
प्रक्रिया करणारे युनिट, डाळ, तांदूळ गिरणी, पिठ गिरणी, खाद्याशी संबंधीत उद्योग,
दुग्धशाळा, खाद्य व चारा युनिट यांच्या आस्थापना व वाहतूक, शासकीय, निमशासकीय
वाहने, व कर्मचारी यांची कर्तव्यावर असताना वापरली जाणारी खाजगी वाहने, अत्यावश्यक
सेवा व आस्थापना सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत सुरू राहतील, तर सायं. 5 ते सकाळी
9 वाजेपर्यंत वैद्यकीय तपासणीचे कारण वगळता अन्य कोणत्याही कारणास्तव घराबाहेर
पडता येणार नाही. याशिवाय कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडणे आशव्यक असल्यास
संबंधित तहसीलदार यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
अत्यावश्यक सेवा, शासकीय, निमशासकीय प्रवास
वाहतुकीसाठी संबंधीतांनी त्यांचे ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे. तसेच परवानी देण्यात
आलेल्या सेवांसाठीच्या वाहतुकीसाठीही ओळखपत्र सोबत ठेवावे व वाहनावर स्वयंघोषीत
फलक लावावा. कन्टेन्मेंट झोन अर्थात बाधीत क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची सूट
लागू असणार नाही.
00000
Comments
Post a Comment