पोस्ट कार्यालयामधील सर्व आधार सेवा केंद्र सुरु /टपाल खात्याची बँक AePS प्रणाली सुरु


पोस्ट कार्यालयामधील सर्व आधार सेवा केंद्र सुरु
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.)  दि. 27 : सध्‍या राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव चालू आहे.  त्या अनुषंगाने जिल्ह्यातील पोस्ट कार्यालयामधील सर्व आधार सेवा केंद्र सुरक्षितेच्या दृष्‍टीकोनातून बंद ठेवण्यात आली होती. नागरीकांना आपले महत्त्वाचे व्यवहार करण्यासाठी आधार कार्डची आवश्‍यकता भासत असून, जिल्हयातील पोस्ट कार्यालयामधील सर्व आधार सेवा केंद्र सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा अपर जिल्‍हादंडाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली.
            भारत सरकारच्या दि. 28 एप्रिल 2020 रोजीच्या परिपत्रकानुसार काही अटी व शर्तीला अधीन राहून जिल्हयातील आधार सेवा केंद्र चालकांना सुरु करण्यास मुबा देण्यात येत आहे. सर्व आधार केंद्र चालकांनी आपल्या आधार सेवा केंद्राचा परिसर दररोज स्वच्छ ठेवाण्यात यावे.  सर्व केंद्र चालकांनी कोरोनाच्या वैयक्ति‍क स्वच्छता पद्धतीचे पालन करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी वारंवार साबण व सॅनिटायझरने हात स्वच्छ करावे. डोळे/नाक/तोंड यांना स्पर्श करण्यात येऊ नये. मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य आहे. फक्त फोटो काढताना मास्क काढण्यात यावा.
            आधार नोंदणी करताना प्रत्येक नागरीकांनी हात सेनिटायझरने स्वच्छ करावे. प्रत्येक नोंदणीनंतर बायोमॅट्रीक उपकरणे सेनिटायझरने स्वच्छ करण्यात यावी. नोंदणी केंद्राच्या ठिकाणी टेबल व ऑपरेटर यामध्‍ये कमीत कमी 1 मीटर सामाजिक अंतर ठेवावे. तसेच ऑनलाईन भेटीसाठी वेळ देताना मर्यादा घालावी. गर्दी टाळण्‍यासाठी ऑनलाईन नोंदणी न करता येणाऱ्या नागरीकांना आधार केंद्रामध्‍ये येण्‍यासाठी परवानगी देऊ नये. केंदामधील खुर्च्यांची व्यवस्था वैकल्प‍िक   बसण्‍याच्या ठिकाणी  मोकळी हवा येईल याची व्यवस्था करावी.  केंद्रामधील कर्मचाऱ्यांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असल्यास आधार नोंदणी केंद्रावर न येण्‍याचा सल्ला द्यावा. यासूचना आधार केंद्र चालकांनी  दर्शनी भागात लावावी. आधार नोंदणी सेवा केंद्रामधील कर्मचा-यांनी वेळोवेळी प्रशासनाने घोषित केलेल्या कोवि‍ड-19 प्रतिबंधीत क्षेत्राबाबतची माहिती, प्रवास करणे व प्रवेश देण्यात येऊ नये.  आधार सेवा केंद्र चालकांनी सर्व सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन आधार केंद्र सुरु करावीत, असे जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.        
000
टपाल खात्याची बँक AePS प्रणाली सुरु
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.)  दि. 27 : कोरोना काळातही जिल्ह्यातील पोस्ट कार्यालये ग्रामीण व दुर्गम भागातही तत्परतेने सर्व बाँकिंग सेवा घरपोच उपलब्ध करुन देण्यात येत आहे, अशी माहिती टपाल खात्याचे अधीक्षक डाकघर के. एन. बावनकुळे यांनी दिली.
            लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या सोयीसाठी घरपोच बाँकिंग सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी पोस्ट खात्याने इंडिया पोस्ट पेमेंट बँक सुरु करण्यात आली आहे.  या नवीन AePS प्रणालीद्वारे जनतेला घरबसल्या आपल्या नावे असलेल्या कोणत्याही बँकेच्या खात्यातून पोस्टमनमार्फत पैशाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी आपल्या बँक खात्याशी संलग्न असलेल्या आधार नंबरची आवश्‍यकता आहे. डिजिटल पद्धतीने कुठल्याही कागदपत्राशिवाय अत्यंत सुलभपणे हा व्यवहार करता येणार आहे. जनतेने या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'