एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जिमाका) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन 2026-27 या वर्षासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्वसाधारण प्रवर्गासह विशेषतः अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना रोपवाटिका स्थापन करणे, (स्ट्रॉबेरी, ड्रॅगनफ्रूट, पॅशन फ्रूट, किवी, अवोकॅडो, केळी, अननस, पपई) आदी फळपिकांची लागवड, अळिंबी उत्पादन प्रकल्प, पुष्पोत्पादन, सुगंधी व औषधी वनस्पतींची लागवड, सामूहिक व वैयक्तिक शेततळे, शेततळ्यांचे अस्तरीकरण, हरीतगृह, शेडनेटगृह उभारणी, प्लास्टिक मल्चिंग, फळांना व घडांना कव्हर, तण नियंत्रक अच्छादन, मधुमक्षिका पालन, फलोत्पादन यांत्रिकीकरण (ट्रॅक्टर, पॉवर टिलर व पीक संरक्षण उपकरणे) फार्म गेट पॅक हाऊस, शीतगृह, शीतवाहन, प्राथमिक प्रक्रिया केंद्र तसेच रायपनिंग चेंबर अशा विविध घटकांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक असून, 'प्रथम अर्ज – प्रथम लाभ' या तत्त्वानुसार लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील अर्जदारांकडे जातीचे प्रमाणपत्र तसेच फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. लाभार्थ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची मोका तपासणी झाल्यावर त्यांच्या बँक खात्यात निधी तात्काळ जमा करण्यात येणार आहे. यापूर्वी संबंधित घटकांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तसेच अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजिकच्या मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, संबंधित गावातील उपकृषी अधिकारी किंवा सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. 0000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'