सिंधुरत्न समृद्ध योजने'च्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार - पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी, दि. १५ (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारी आणि रोजगार निर्मितीला चालना देणारी महत्वाकांक्षी अशी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली सर्व कामे संबंधित यंत्रणेने निर्धारित कालावधीत पूर्ण करावीत. ‘सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या माध्यमातून लोककल्याणकारी आणि विकासाभिमुख योजना राबवून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचे सिंधुरत्न कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री नितेश राणे म्हणाले. १८ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ ला मान्यता देण्यात आली आहे. या अनुषंगाने योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत पालकमंत्री बोलत होते. बैठकीस आमदार दीपक केसरकर हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रकल्पांची सद्यस्थिती, प्रगती, अंमलबजावणीतील अडचणी तसेच त्यावरील उपाययोजनांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या आणि दीर्घकालीन लाभ मिळवून देणाऱ्या प्रकल्पांना प्राधान्य देण्याबाबतही बैठकीत भर देण्यात आला. पालकमंत्री श्री. राणे म्हणाले की, ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे पर्यटन, रोजगार, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासाच्या क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्हा अधिक सक्षम होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, दरडोई उत्पन्नात वाढ आणि नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे मंजूर प्रकल्पांचे नियोजनबद्ध पद्धतीने आणि वेळेत काम पूर्ण होणे आवश्यक आहे. पर्यटन क्षेत्राच्या विकासावर विशेष भर देत त्यांनी सांगितले की, सिंधुदुर्गच्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वैभवाचा अधिक प्रभावीपणे उपयोग करून पर्यटनवृद्धी साधणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील १० ते १५ महत्त्वाच्या पर्यटनस्थळांचा दर्जात्मक विकास केल्यास पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढू शकते. पर्यटकांची वाढ ही स्थानिक रोजगार, व्यवसाय, वाहतूक, निवास व्यवस्था आणि सेवा क्षेत्रासाठी मोठी संधी निर्माण करणारी ठरेल. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल असेही ते म्हणाले. पालकमंत्री पुढे म्हणाले की, आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘सिंधुरत्न समृद्ध’ योजनेच्या माध्यमातून लोकाभिमुख आणि विकासाभिमुख उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत. या योजनांचा लाभ जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला असल्याचेही ते म्हणाले. या योजनेत प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च होण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. कोणताही निधी अखर्चित राहणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की, ही योजना जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. विशेषत: या योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी नाविन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'