राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियानांतर्गत नाचणीच्या बियाण्यासाठी अर्ज करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि. १२ (जि.मा.का) :- पौष्टिक तृणधान्यांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी शासनामार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियान (NFSM-Nutri Cereals) राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत खरीप हंगामासाठी नाचणी (नागली) पिकाचे प्रमाणित बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असून, इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ‘शेतकरी योजना’ निवडून आपल्या युझर आयडी-पासवर्ड किंवा आधार क्रमांकाद्वारे लॉगिंन करुन अर्ज करा या पर्यायावर क्लिक करुन बियाणे, औषधे व खते ही बाब निवडा. सर्व माहिती भरून अर्ज जतन करून विहित शुल्कासह अर्ज सादर करावा. ऑनलाईन अर्जासाठी चालू वर्षाचा ७/१२ उतारा, ८-अ उतारा आणि आधार कार्ड आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संबंधित गावातील सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेनुसार प्रमाणित बियाण्यांवर आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे. बियाण्यांची खरेदी केल्यानंतर हे अनुदान थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल. महिला शेतकरी, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी तसेच अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे. नाचणी हे पौष्टिक तृणधान्य असून त्यामध्ये कॅल्शियम, लोह आणि फायबरचे प्रमाण भरपूर असल्याने त्याला ‘सुपरफूड’ म्हणून ओळखले जाते. तसेच कमी पाण्यात आणि हलक्या जमिनीतही हे पीक चांगले येत असल्याने हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी ते फायदेशीर ठरत आहे. सुधारित व प्रमाणित बियाण्यांच्या वापरामुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'