जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात १५५ हून अधिक वृक्षांची लागवड

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक सिंधुदुर्ग, दि. २६ (जिमाका): पर्यावरण संवर्धनाचा दृढ संदेश देत आणि 'हरित जिल्हाधिकारी कार्यालय' ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्याच्या दिशेने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमाअंतर्गत कार्यालय परिसरात १५५ हून अधिक विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते कार्यालय परिसरातील तुळशी वृंदावनात शास्त्रोक्त पद्धतीने रोप लावून करण्यात आला. यावेळी पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. या वृक्षारोपण मोहिमेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रत्येक शाखेला निश्चित जागा देण्यात आली होती. त्या ठिकाणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षलागवड केली. सामूहिक सहभागातून पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून देण्यात आला. विशेष म्हणजे, पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान या हरित उपक्रमाचे कौतुक करत प्रशासनाच्या पर्यावरणपूरक कार्याची प्रशंसा केली. या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, अधिष्ठाता डॉ. अनंत दवंगे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, बालाजी शेवाळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वृक्षारोपण मोहिमेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. केवळ वृक्ष लागवड न करता त्यांचे संगोपन व संवर्धन करण्याचाही निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पर्यावरण संरक्षणासाठी प्रशासनाने घेतलेल्या या पुढाकाराचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर आता अधिक हिरवागार, निसर्गसंपन्न आणि पर्यावरणपूरक बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'