तूर बियाणे संचासाठी अर्ज करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि.१२ (जि.मा.का) :- कडधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘कडधान्य आत्मनिर्भरता अभियान’ अंतर्गत चालू खरीप हंगामासाठी तूर बियाणे संच (मिनीकीट) १०० टक्के अनुदानावर वितरित करण्यात येणार आहेत. यासाठी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ विभागात लॉगिन करून ‘बियाणे, औषधे व खते’ या घटकाअंतर्गत ‘बियाणे’ हा पर्याय निवडावा. त्यानंतर मुख्य पिकामध्ये ‘तूर’ आणि बाबींमध्ये ‘कडधान्य आत्मनिर्भरता अभियान - बियाणे संच (मिनीकीट)’ हा पर्याय निवडून अर्ज करावा.या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना तूर बियाणे संच पूर्णपणे मोफत १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले जाईल. महिला शेतकरी, अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जामाती (ST) तसेच अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. एका शेतकऱ्यास एकाच मिनीकीटचा लाभ घेता येणार आहे. ऑनलाईन अर्जासाठी सात बारा उतारा, ८-अ उतारा, आधार कार्ड आणि बँक पासबुकची प्रत आवश्यक आहे. महाडीबीटी पोर्टलवरील अर्जांमधून लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाणार असल्याने पात्र शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. अर्ज प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी किंवा अडचणी आल्यास संबंधित गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. कडधान्य उत्पादन वाढविणे, सुधारित व उच्च उत्पादकता देणाऱ्या तूर वाणांचा प्रसार करणे तसेच देशाची कडधान्य आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच बियाण्यांचा खर्च वाचल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही भर पडणार आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'