राष्ट्रीय लोक अदालतीचे १३ डिसेंबर रोजी आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 09 (जि.मा.का):- मुंबईचे उच्च न्यायालय न्यायमूर्ती तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती अभय आहुजा व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये व जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक यांनी दिली आहे. सन २०२५ या वर्षातील ही चौथी लोक अदालत आहे. जिल्ह्यातील सर्व न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग तसेच सर्व तालुका न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये नेमुन घेण्याबाबत पक्षकारांना आवाहन करण्यात येत आहे. तडजोड होऊ शकणारी प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी १३ डिसेंबर, २०२५ चे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवावयाची असल्यास संबंधित न्यायालयात जावून प्रकरण तडजोडीसाठी ठेवावयाचे आहे, असे संबंधित अधीक्षक अथवा लिपिक तसेच संबंधित वकिलांनी कळवावे. लोक अदालतीत तडजोड झाल्याने कायमस्वरुपी वाद मिटू शकेल, शुल्लक वादाचे पर्यावसन कायमस्वरुपी वादात होणार नाही, वैराने वैर वाढतच राहते असे होऊ नये, यासाठी सामंजस्य घडवावे हाच लोक अदालतीचा हेतू आहे. शिवाय लोक अदालतीतील निकालाविरुध्द अपिल होत नाही, वेळ व पैशांची बचत होते. या लोक अदालतीमध्ये दिवाणी, तडजोडपात्र स्वरुपाची फौजदारी, कौटुंबिक वाद, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे इ. प्रकरणे ठेवावयाची असल्यास संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, संपर्क क्र.०२३६२ २२८४१४, किंवा मोबा. ८५९१९०३६०७,हेल्पलाईन क्रमांक १५१०० किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'