मतदानासाठी 2 डिसेंबर रोजी भरपगारी सुट्टी
सिंधुदुर्गनगरी दि.01 (जिमाका) :- राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यानुसार लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 मधील कलम 135 (ब) तरतुदीच्या आदेशानुसार सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स,रिटेलर्स मध्ये काम करणाऱ्या कामगार मतदारांना व निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणूकीचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश आहेत. अशी माहिती सरकारी कामगार अधिकारी रविराज कदम यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत मिळेल याची दक्षता संबंधीत आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.
०००००
Comments
Post a Comment