आंबा फळमाशी नियंत्रणासाठी सिंधुरत्न योजनेचा लाभ घ्यावा

सिंधुदुर्गनगरी, दि.18 (जि.मा.का): जिल्ह्यात आंबा पिकावरील फळमाशीचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन आंबा फळमाशीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी सिंधुरत्न समृध्द योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमधुन फळमाशीचे एकाचवेळी सामुहिक नियंत्रण करण्याकरीता आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषि विभागामार्फत रक्षक सापळे 4 नग प्रति हेक्टर व 4 ल्युर्स प्रति हेक्टर याप्रमाणे 75 टक्के अनुदान तत्वावर पुरवठा करण्यात येणार आहे. तरी योजनेचा सामुहिक स्वरुपात आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत- जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे. फळमाशीचे एकाच वेळी सामुहिकरित्या नियंत्रण करुन प्रादुर्भाव कमी करता येईल व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळता येईल. या योजनेंतर्गत अर्ज स्विकारण्याची प्रक्रीया तालुका कृषि अधिकारी यांच्यास्तरावर होणार असून जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधुन अर्ज करावेत व अर्जासोबत आंबा पिकाची नोंद असलेला 7/12 जोडावा. सिंधुदुर्ग जिल्हा हापुस आंब्यासाठी जगप्रसिध्द असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा पिकाखाली एकुण 34250 हेक्टर एवढे क्षेत्र असून त्यापैकी साधारणत: 27575 हेक्टर एवढे उत्पादनक्षम क्षेत्र आहे. आंबा पिकावर फळमाशीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. फळमाशी ही बहुभक्षी कीड असून प्रौढ फळमाशी फळामध्ये अंडी घालते. अंड्यातुन 24 तासांच्या आत अळ्या बाहेर पडतात. ह्या अळ्या परीपक्व होत असलेल्या फळातील गर खातात त्यामुळे फळे सडतात व गळून पडतात. आंबा बागेमध्ये गळुन पडलेल्या लहान मोठ्या फळांमध्ये फळमाशीच्या अळ्या मोठ्या प्रमाणात आढळून येतात व त्यांची वाढ पुर्ण झाल्यावर त्या जमिनीत कोषावस्थेत जातात. आंबा बागेतील वळुन पडलेली लहान मोठी फळे गोळा करुन जाळुन नष्ट करण्याची आवश्यकता असते. फळमाशी शक्यतो पुर्ण पक्व झालेल्या फळांमध्ये अंडी घालते त्याकरीता फळे पुर्ण पक्व होण्यापुर्वी म्हणजेच 85 टक्के पक्व झाल्यावर काढणे गरजेचे असते. जमिनीतील फळमशीच्या कोषांचा नायनाट करण्यासाठी फळांची काढणी झाल्यानंतर झाडाखालची जमिन नांगरावी त्यामुळे जमिनीतील कांष पृष्ठभागावर येतात व उन्हात तापुन मरतात किंवा मुंग्या व पक्षांचे भक्ष बनतात. फळमाशीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आंबा बागेमध्ये फळमाशी रक्षक सापळे हेक्टरी 4 या प्रमाणात बागेच्या चारही दिशांना झाडाच्या फांदीवर जमिनीपासून 5 ते 10 फुटावर टांगते राहतील अशा प्रकारे लावणे गरजेचे आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'