महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.3 (जि.मा.का.) : महाराष्ट्र राज्य नाविन्यता परिषदेमार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज ही स्पर्धा राबविण्यात येत असून या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील संस्था, महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र.सहायक आयुक्त ग.पां.चिमणकर यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य नाविन्यता परिषदेमार्फत राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी व नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यसाठी महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज चे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांचा शोध घेणे व त्यांचे नवउद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी योग्य ते पाठबळ पुरविणे हे महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चैलेजचे मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाच्या नोंदणीकरीता संस्थानी / महाविद्यालयांनी दिनांक 15 जुलै 2023 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये आणि नवसंकल्पना असलेल्या विद्यार्थी उमेदवारांनी दिनांक 1 ऑगस्ट 2023 ते दि.31 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये अर्ज करावेत. यात सहभागी होण्याकरिता www.msins.in अथवा www.schemes.msins.in या संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करता येणार आहे. जिल्हयातील कोणतीही संस्था तसेच संस्थेतील विद्यार्थी व इतरही उमेदवार या महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. जिल्हयातून विजेत्या उत्कृष्ट संकल्पनांना रुपये 1 लाखाचे बीज भांडवल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्य स्तरावर विजेत्या नव उद्योजकांना प्रत्येकी 10 लक्ष रुपये बीज भांडवल स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर सप्टेंबर 2010 मध्ये प्रधानमंत्री यांच्या सल्लागाराच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नाविन्यता परिषद (National Innovation Council NinC): ची स्थापना करण्यात आली आहे. या परिषदेचा मुख्य उद्देश देशातील युवकामधील सृजनशिलता विकसीत करुन त्यांच्यातील प्रतिभेच्या माध्यमातून नवनिर्मिती करणे, त्याकरिता पोषक वातावरण तयार करणे, नवनवीन संकल्पनांचा विकास करणे, नविन कार्यपध्दती, निर्मितीपध्दती. वितरण प्रणाली इ. बाबींच्या अंतर्भावासह गतिमान व संवेदनशील पध्दतीने व्यवस्थापन शासन व्यवस्था निर्माण करणे व त्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचे जीवन सुखर करणे हा आहे. त्याच धर्तीवर केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात महाराष्ट्र राज्य नाविन्यता परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य नाविन्यता परिषदेमार्फत सतत नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. तरी जास्तीत जास्त युवकानी या महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्र. ०२३६२-२२८८३५, ई-मेल आयडी sindhudurgrojgar@gmail.com वर संपर्क करा. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'