"दक्ष महिला सक्षम महिला " पुस्तिका महिलांसाठी उपयुक्त तर असहाय्य व पिडीत महिलांसाठी मार्गदर्शक - सहाय्यक धर्मादाय आयुक्त एम. एस. निकम
सिंधुदुर्गनगरी, दि. 9 (जि.मा.का) : महिलांनी महिला विषयक असणारे कायदे याबाबत जागृत राहणे आवश्यक आहे. महिला व बाल विभागामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या "दक्ष महिला सक्षम महिला " हि पुस्तिका समाजातील सर्व महिलांना निश्चितच उपयुक्त तर आहेच शिवाय असहाय्य व पिडीत महिलांसाठी ही पुस्तिका मार्गदर्शक अशी राहणार आहे असे विचार सहाय्यक धर्मादाय आयुक्त एम. एस. निकम यांनी व्यक्त केले.
जिल्हास्तरावरील जागतिक महिला दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील जुन्या नियोजन समिती सभागृहात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकारण यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.यावेळी सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण डी. बी. म्हालटकर प्रा. माया रहाटे व प्रा. अमर निर्मळे, सदस्य बाल कल्याण समिती, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त शेख, जिल्हा क्रिडा अधिकारी विद्या शिरस, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुवर्णा माधव उपस्थित होते.
धर्मादाय आयुक्त एम. एस. निकम यांनी यावेळी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधि 2005 तसेच कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण प्रतिबंध अधिनियम 2013 याबाबत सविस्तर मार्गदर्शन करुन महिलांनी आपल्या अधिकार आपली कर्तव्य जबाबदाऱ्या याबाबत नेहमी सजग व सतर्क रहावे. असे आवाहन केले.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ, यांनी मान्यवराचे स्वागत करुन प्रास्ताविक करताना म्हणाले, 8 मार्च 2023 ते दि. 14 मार्च 2023 या सप्ताहात जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये "दक्ष महिला सक्षम महिला" अभियान राबविण्यात येणार असून या अभियानामध्ये तालुका संरक्षण अधिकारी अभय केंद्र, महिला समुपदेशन केंद्र, तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचे मार्फत तालुकास्तरावर व ग्रामपंचायत पातळीवर प्राथमिक शाळा, हायस्कूल, बचतगट, महिलामंडळे, स्वयंसेवी संस्था, यांचे संयुक्त विद्यमाने महिला विषयक कायदे, महिलांचे हक्क व संरक्षण यामध्ये कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधि, 2005 बालविवाह प्रतिबंध अधि 2006, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधि. 1956 कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण प्रतिबंध अधिनियम 2013, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधि, 2012, हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961, शुभमंगल सामुहीक विवाह योजना, बालसंगोपन योजना, मनोधैर्य योजना, महिला लोकशाही दिन अभय केंद्र, सखी वनस्टॉप केंद्र, महिला समुपदेशन केंद्र, इत्यादी योजनांची माहिती देण्यात येऊन जनजागृती व प्रबोधन करण्यात येणार असल्याचे त्यांनी माहिती दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. बी. म्हालटकर यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कायदेविषयक माहिती देऊन महिला व बालके, दिव्यांग व्यक्ती, कैद्यांना आणि न्यायाधिन बंदींना यांना मोफत विधी सेवा पुरविल्या जात असल्याचे सांगून कायदेशीर कार्यवाही प्रक्रियेत समुपदेशनाच्या स्वरुपात मोफत विधी सहाय्य पुरविले जाते.अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग येथे संपर्क साधणेचे आवाहन त्यांनी केले.
बाल कल्याण समितीचे सदस्य प्रा. माया रहाटे म्हणाल्या, महिलांच्या शारिरीक स्वास्थाबरोबर मानसिक स्वास्थ चांगले राहणे गरजेचे आहे. त्याकरिता महिलांनी आपले आरोग्याची योग्य काळजी घेऊन मनातील ताणतणाव कसे कमी करता येतील यावर भर द्यावा. प्रत्येक महिलेने आपल्या कामाच्या व्यापामध्ये प्राधान्याने वैयक्तिक पातळीवर योग्य समन्वय ठेऊन मानसिक स्वास्थ चांगले राखण्यासाठी प्रयत्न करावे.
तज्ज्ञ मार्गदर्शक अॅड. वेदिका राऊळ यांनी महिलांना विविध कायदे विषयक माहिती दिली तसेच अॅड. निकिता म्हापणकर यांनी महिलांचे घटनात्मक अधिकार त्याच बरोबर महिलांसाठी प्रसुती रजा, तसेच पीसीपीएनडी या कायदे विषयक माहिती दिली. जिल्हा परिविक्षा अधिकारी बी. जी. काटकर, यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून हुंडा प्रतिबंध अधिनियम अंतर्गत जनजागृती होणेसाठी मी हुंडा घेणार नाही, मी हुंडा देणार नाही अशी उपस्थित सर्व महिलांना शपथ देण्यात आली. कणकवलीचे संरक्षण अधिकारी मिलन कांबळे यांनी आभार मानले.
आयोजित कार्यक्रमास जिल्हा मुख्यालयातील विविध विभागाच्या महिला अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे हस्ते "दक्ष महिला सक्षम महिला" या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. महिला अधिकारी व कर्मचारी यांचेकरिता आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर आरोग्य तपासणी मध्ये बहुसंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.
00000
Comments
Post a Comment