“श्रमदानातून परिसर स्वच्छता मोहीम”

सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जिमाका) :- ग्रामीण भागातील स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यासाठी आणि स्वच्छतेची एक लोकचळवळ निर्माण करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन यांच्या वतीने दिनांक 4 जून 2026 रोजी संपूर्ण जिल्ह्यात विशेष 'श्रमदानातून परिसर स्वच्छता मोहीम' राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांत जिल्हावासियांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छता क्षेत्रात कायम आग्रेसर राहिला आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने सध्यस्थितीत जिल्हा पर्यटकांनी फुलला आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात कचऱ्याचेही प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रातुन जाणारे रस्ते, मोक्याची ठिकाणे, समुद्र किनारे, पर्यटन स्थळे स्वच्छ व्हावीत या हेतुन दिनांक 04 जुन 2026 रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत एकाच वेळी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात श्रमदानातून परिसर स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत गावातील शाळा, अंगणवाड्या, सर्व शासकीय कार्यालये, मंदिरे, बाजारपेठा, सार्वजनिक रस्ते आणि ज्या ठिकाणी कचरा साचलेला आहे, अशा सर्व ठिकाणांची श्रमदानातून स्वच्छता केली जाणार आहे. या मोहिमेच्या यशस्वी नियोजनासाठी व लोकप्रतिनिधींचा सहभाग घेण्याकरीता प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश सर्व तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सन्माननीय लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, विविध स्वयंसेवी संस्था (NGOs) आणि स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कचऱ्याचे वर्गीकरण आणि योग्य विल्हेवाट श्रमदानातून गोळा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट प्लास्टिक आणि जैविक कचरा असे वर्गीकरण करून संबंधित ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तातडीने योग्य व्यवस्थापन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. "स्वच्छ आणि सुंदर सिंधुदुर्ग घडवण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. ग्रामस्तरावर दवंडी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या मोहिमेची व्यापक प्रसिद्धी करून जास्तीत जास्त नागरीकांना सहभागी करून घ्यावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे. ००००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'