‘पद्म पुरस्कार-2027’ साठी ऑनलाईन नामांकने सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जिमाका) :- भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या “पद्म पुरस्कार -2027” (पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री) साठी ऑनलाईन नामांकने आणि शिफारशी स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून नामांकने सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै, 2026 अशी आहे,अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार, हे नामांकन केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार असून, यासाठी शासनाचे अधिकृत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल https://awards.gov.in कार्यान्वित करण्यात आले आहे. या क्षेत्रातील कामगिरीची घेतली जाणार आहे दखल: कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, औषधोपचार (वैद्यकीय), सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक घडामोडी ,नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यासारख्या सर्व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय, विशिष्ट आणि अपवादात्मक कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. जात, व्यवसाय, पद किंवा लिंग असा कोणताही भेदभाव न करता सर्व नागरिक या पुरस्कारासाठी पात्र आहेत. नामांकनासाठी महत्त्वाचे निकष व वैशिष्ट्ये: तळागाळातील गुणांचा शोध; समाजातील वंचित घटक, महिला, अनुसूचित जाती व जमाती,(SC/ST) दिव्यांग व्यक्ती आणि निस्वार्थ भावनेने लोकसेवा करणाऱ्या गुणवंत व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना प्राधान्य देण्यात यावे. शासकीय कर्मचाऱ्यांना मर्यादा: डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता इतर सर्व सरकारी कर्मचारी आणि सार्वजनिक उपक्रमामध्ये (PSUS) कार्यरत कर्मचारी या पुरस्कारासाठी पात्र नाहीत. मरणोत्तर पुरस्कर: हा पुरस्कार सामान्यतः मरणोत्तर दिला जात नाही. मात्र, अत्यंत अपवादात्मक आणि योग्य प्रकरणात, संबंधित व्यक्तीचे निधन 26 जानेवारी 2027 पूर्वीच्या एक वर्षाच्या आत झाले असल्यास विचार केला जाऊ शकतो. स्वतः देखील करता येणार शिफारस: या पुरस्कारासाठी कोणतीही व्यक्ती किंवा संस्था इतर योग्य व्यक्तीच्या नावाची शिफारस करू शकते, तसेच नागरिक स्वतःचे नामांकन (Self -nomination) देखील नोंदवू शकतात.यासाठीची सविस्तर नियमावली https://padmaawards.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जास्तीत जास्त पात्र व गुणवंत व्यक्तींची नामांकने वेळेत सादर व्हावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. ००००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'