जिल्ह्यात 8 जूनपर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि.२७ (जि.मा.का):- जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 25 मे 2026 रोजी 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 08 जून 2026 रोजी 24 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला असल्याचे जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. जिल्ह्यात दिनांक २७ मे २०२६ रोजीपासून बकरी ईद, दिनांक ३१ मे २०२६ रोजी अहिल्याबाई होळकर जयंती, दिनांक ६ जून २०२६ रोजी शिवराज्याभिषेक सोहळा, असे सण उत्सव साजरे करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यापुर्वी राज्यात उत्सवाचे कालावधीत जातीय घटना घडलेल्या असून त्याचे पडसाद राज्यात उमटून विविध राजकीय पक्ष व संघटना आक्रमक झालेल्या आहेत. आगामी काळात त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटून जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या राज्यात शक्तिपीठ महामार्ग, आंबा व काजू शेतकरी,संघटना व इतर मुद्यांवरुन जिल्ह्यातील विविध संघटनेकडून निवेदन, निषेध आंदोलन करण्यात येत आहेत. मराठा व ओबीसी समाजाचे लोक आरक्षणाचे मुद्यावरुन उपोषण, आंदोलन होत आहेत. तसेच सोशल मिडीयावर समाजकंटकांकडून धार्मिक भावना दुखवणारे आक्षेपार्ह पोस्ट व व्हिडीओ प्रसारीत करुन विविध समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटत आहेत. वैयक्तिक व सामाईक मागणीकरीता उपोषणे मोर्चा, संप, निदर्शने, रस्ता रोको वगैरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रमांचे वेळोवेळी नियोजन करण्यात येते. अशावेळी आंदोलनकर्ते यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू, शक्तिपीठ महामार्ग व विविध समाजांचा आरक्षण मुद्दा व आगामी साजरे होणारे सण, उत्सव त्याअनुषंगाने जिल्ह्यात आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम सोशल मिडीयावर व्हायरल होणारे आक्षेपार्ह पोस्ट, तसेच जिल्ह्यात होणारी उपोषणे, मोर्चा, संप, निदर्शने, रस्ता रोको या सारख्या प्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोठेही अनुचित प्रकार घडू नये. जिल्ह्यातील जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी, यासाठी जिल्ह्याच्या संपुर्ण भूभागात मनाई आदेश लागू करण्यात येत आहे. वरील कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात पुढील कृत्य करण्यास मनाई करण्यात येत आहे. कलम ३७ (१) नुसार १) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे. २) अंग भाजून टाकणार पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेवून फिरणे. ३) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. ४) व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, (ज्या कारणामुळे समाजाच्या भावना दुखविली जाण्याची शक्यता असते.) ५) सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणे. ६) सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे. कलम ३७(३) नुसार १) सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे मिरवणूका काढणे व सभा घेणे. २) हा हुकूम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपनिर्दीष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे. अशा व्यक्तींना आणि लग्न, धार्मिक समारंभ, कार्याक्रम प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही . वरील कालावधीतील मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांस राहील. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'