प्रत्येक ठिकाणी मराठी भाषेचा सन्मान करावा- प्रा.डॉ. नंदकुमार मोरे अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त लोकराज्य विशेष मराठी साहित्य ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन
कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) :भाषा जितकी व्यवहारात अधिक असेल तितकी ती समृद्ध होते. त्या भाषेची उपयोगिता वाढते.त्यामुळे शक्य असेल ते सर्व व्यवहार मराठीतून व्हावे मराठीतून संभाषण व्हावे आणि मराठीतूनच प्राथमिक शिक्षण व्हावे,असे आवाहन शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.नंदकुमार मोरे यांनी आज येथे केले.
जिल्हा माहिती कार्यालय व विभागीय माहिती कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त लोकराज्य विशेष मराठी साहित्य ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.नंदकुमार मोरे बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक प्रवीण टाके होते.या कार्यक्रमाला जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर,जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, सहायक संचालक वृषाली पाटील यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा गौरव आणि साहित्य संपदेला प्रोत्साहन देण्यासाठी अभिजात मराठी भाषा सप्ताह दिनांक 3 ते 9 ऑक्टोबर 2025 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने मराठी साहित्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कसबा बावडा, कोल्हापूर येथे करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा.डॉ.नंदकुमार मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. ९ ऑक्टोबर पर्यंत हे प्रदर्शन शासकीय कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सर्वसामान्यांसाठी खुले असणार आहे.
या प्रदर्शनात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे मुखपत्र असणारे लोकराज्य मासिकाचे सन 1967 पासून ते आजपर्यंचे अंक, सामाजिक न्यायाच्या दिशेने, आपला कोल्हापूर जिल्हा, कन्यागत महापर्वकाल, महाराष्ट्र वार्षिकी, विविध कॉफी टेबल बुक अशी ग्रंथ संपदा, पुस्तके या प्रदर्शनामध्ये लावण्यात आली आहेत.अभ्यासक, वाचक,पत्रकार व चिकित्सकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन उपसंचालक प्रवीण टाके यांनी केले आहे.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात भाषा जपण्याचे, तिचा अभिमान बाळगण्याचे आणि नव्या पिढीला वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार असल्याचे विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक श्री. टाके यांनी सांगितले.
प्रत्येक ठिकाणी आपल्या भाषेचा सन्मान करावा- प्रा.डॉ. नंदकुमार मोरे
आपण शहर सोडले की हिंदी किंवा इंग्रजीत माहिती विचारतो. आपल्या कामाच्या ठिकाणी दोघेही मराठी असताना इतर भाषेचा वापर करतो. अशा वेळी आपण आपल्या भाषेला प्राधान्य दिले पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आपल्या भाषेचा सन्मान करायला पाहिजे असे प्रतिपादन प्रा.डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले.
मराठी भाषा १३ कोटी लोकांकडून बोलली जाणारी भाषा आहे. जगात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये तिचा ११ वा क्रमांक लागतो. अशा या मराठी भाषेचा दर्जा अधिकाधिक उंचाविण्यासाठी काम करूया असे आवाहन त्यांनी केले. डिजिटल कामकाजात युनिकोड च्या वापरामुळे सहजता येते. इतर फाँट वापरून भाषेचं नुकसान होते. मराठी ही भाषा स्वतःची वेगळी ओळख असणारी भाषा आहे. तिला स्वतःची अशी परंपरा आहे.
यावेळी त्यांनी मुलांचे प्राथमिक शिक्षण मराठी शाळांमध्ये होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.त्यामुळे अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये मुलांना आपल्या मातृभाषेचे ज्ञान अधिक समृद्धपणे आत्मसात करता येते असेही स्पष्ट केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी राज्य शासनाकडून सुरू असलेल्या मराठी अभिजात भाषा गौरव दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली.मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी प्राध्यापक रंगनाथ मराठी यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा समितीने केलेल्या कार्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.आपली भाषा समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने ते ज्या क्षेत्रात आहेत त्या क्षेत्रातून काम करावे,असे आवाहन यावेळी त्यांनी केले.मराठी अभिजात भाषा गौरव दिनानिमित्त जिल्ह्यातील पुढील कार्यक्रमाची रूपरेखा त्यांनी सांगितली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वृषाली पाटील यांनी तर आभार उपसंपादक रणजित पवार यांनी मानले.
0000
Comments
Post a Comment