व्यसनमुक्त गड किल्ले संवर्धन मोहिमेचा 11 ऑक्टोंबर रोजी शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का):- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक गड- किल्यांचे व्यसनमुक्ती संवर्धन मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे, यांच्या हस्ते 11 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता वेंगुर्ला तालुक्यातील यशवंतगड, रेडी येथे होणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आदी उपस्थित राहणार आहेत. नशामुक्त भारत अभियानांतर्गत जिल्हा नशामुक्त भारत अभियान समिती, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, जिल्हा पोलीस विभाग, दुर्गा मावळा प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आणि दुर्गा रक्षक प्रतिष्ठान रेडी यांचा सहभागाने व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आयोजनातून राबवण्यात येणार आहे. यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक गडकिल्यांवर अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जगाच्या नकाशावर ऐतिहासिक वारसा स्थळे असणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यातील गड-किल्ले हे शिवप्रमी आणि पर्यटकांसाठी प्रेरणादायी स्थळे असली तरी सध्या अनेक ठिकाणी नशेच्या पदार्थाचा वापर व अस्वच्छता वाढलेली आहे. या पार्श्वभूमीवर गडकिल्ले व्यसनमुक्त करुन ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी ही मोहिम राबविण्यात येत आहे. गेल्या पंधरा वर्षापासून जिल्ह्यात नशाबंदी मंडळाच्या वतीने अंमली पदार्थविरोधी जनजागृती सुरु आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि सामाजिक संस्थांबरोबर मिळून या चळवळीला नवा वेग देण्यासाठी ही मोहिम सुरु करण्यात येत आहे. या शुभारंभ सोहळ्यासाठी शिवप्रेमी, युवक, महिला बचतगट व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी केले आहे. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'