संविधान दिन साजरा
सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का) :- भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी येथे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिन साजरा करण्यात आला. सहायक आयुक्त श्री. चिकणे यांच्याहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत दि.26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच या कालावधीत भारतीय संविधानाची उद्देशिका / प्रस्ताविका यांचे नियमित वाचन करणे व जनजागृती करणे, महाविद्यालय, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे येथे वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा इत्यादीचे आयोजन करणे, समतादूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाटय व लघुनाटिका याद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त श्री. चिकणे यांनी सांगितले.
या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक बार्टीचे समतादूत अॅड. सगुण जाधव यांनी संविधान प्रास्ताविकेचे महत्व सांगितले. संविधानामुळे प्रत्येक महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला. आज प्रत्येक क्षेत्रात महिला दिसतात हे आपल्या संविधानामुळेच. त्यामुळे प्रत्येक घरा-घरात रोज संविधानाचे वाचन करून त्याचे महत्व समाजावून घेवून आपण अंगिकारले पाहिजे.
या कार्यक्रमास विशेष अधिकारी तुषार गवळी, सहाय्यक लेखाधिकारी उदय यादव, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी स्वप्नील कांबळे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण तसेच इतर मागास बहुजन कल्याण व जिल्हा जात पडताळणी विभागाचे कर्मचारी/अधिकारी तसेच समतादूत (बार्टी) सर्व कर्मचारी, विविध महामंडळातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कनिष्ठ लिपिक महेंद्र माने यांनी केले.
0000
Comments
Post a Comment