जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी दि.२६ (जिमाका) : जिल्ह्यातील उद्योजकांच्या अडचणी, मागण्या व विकासाच्या संधी जाणून घेण्यासाठी स्थापन केलेल्या जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात व सकारात्मक वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत विविध औद्योगिक प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. सावंतवाडी औद्योगिक वसाहतीतील भू-मापन प्रक्रियेला गती देण्यासाठी अध्यक्षांनी सर्व संबंधित विभागांची विशेष बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले. देवगड येथील मल्टीफ्रूट क्लस्टरचे अध्यक्ष श्रीधर ओगले यांनी ड्रोनद्वारे फवारणी तसेच फळप्रक्रिया प्रशिक्षणाची मागणी केली होती. यावर प्रतिसाद देताना जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी ही सर्व प्रशिक्षणे जिल्हा कौशल्य विकास आराखडा 2025-26 मध्ये समाविष्ट असून यावर्षी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच प्रशिक्षण कालावधी उद्योगांच्या गरजेनुसार ठरविण्यास सांगितले. कोकम औद्योगिक समूहाच्या जागेस परवानगीप्रश्नी मार्ग काढला जाणार असल्याचेही अध्यक्षांनी सभेत जाहीर केले. अडाळी व कुडाळ औद्योगिक क्षेत्रांतील विविध समस्यांवरही तपशीलवार चर्चा होऊन उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. या बैठकीला देवगड क्लस्टर सदस्य श्रीधर ओगले, कोकम क्लस्टर सदस्य संजय पार्टे, उद्यमनगर सावंतवाडीचे सदस्य एस.एन. काणेकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक ऋषिकेश गावडे, म.औ.वि.म. रत्नागिरीचे संजय कसबे, कौशल्य विकास अधिकारी सुरज देबाजे, म.रा.वि.वि.कं. विभागीय कार्यालय कुडाळ यांच्या शिवलीला हिरेमठ, ए.आ.वि.प्र. पेन-रायगडचे दशरथ कदम, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत कार्यबळ समिती, जिल्हा सल्लागार समिती, आजारी उद्योग पुनर्वसन समिती, स्थानिक रोजगार समिती व जिल्हा निर्यात प्रोत्साहन समिती यांच्या बैठका देखील जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्या. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'