उच्च न्यायालय व खंडपीठांचे दोन दिवस विशेष लोक अदालत पक्षकारांना आभासी पध्दतीने सहभागी होता येणार
सिंधुदुर्गनगरी 27 (जि.मा.का) :- मुंबई उच्च न्यायालय, नागपुर व औरंगाबाद खंडपीठ येथे प्रलंबित असलेले खटले सिंधुदुर्गातुन आभासी पध्दतीने विशेष लोक अदालतीत तडजोडीने मिटविण्याची संधी विधी सेवा प्राधिकरणाने उपलब्ध केली आहे.
मुंबई, उच्च न्यायालय, नागपुर व औरंगाबाद खंडपीठ येथे दि. 30 नोव्हेंबर 2024 व 1 डिसेंबर 2024 रोजी विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष लोक अदालतीमध्ये मुंबई उच्च न्यायालय, नागपुर व औरंगाबाद खंडपीठ येथे प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हयातील ज्या पक्षकारांची प्रकरणे या ठिकाणी प्रलंबित आहेत व ती तडजोडीने मिटावीत अशी ज्यांची इच्छा असेल ती प्रकरणे विशेष लोक अदालतीमध्ये ठेवता येऊ शकतात.
या विशेष लोक अदालतीमध्ये पक्षकार प्रत्यक्ष किंवा आभासी (ऑनलाईन) पध्दतीने सहभागी होऊ शकतात. सिंधुदुर्ग जिल्हयातील प्रकरणे उच्च न्यायालयाच्या विशेष लोकअदालतीमध्ये ठेवण्यासाठी पक्षकारांनी संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग किंवा तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी केले.
००००
Comments
Post a Comment