गोवा राज्यातील स्थिर सर्वेक्षण पथकाचे (SST) प्रशिक्षण स्थिर सर्वेक्षण पथकाने वाहनांची कसून तपासणी करण्याचे निर्देश

सिंधुदुर्ग, दिनांक २८ ऑक्टोबर(जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहितेच्या अंमलबाजावणीस सुरुवात झाली आहे. आपला जिल्हा दोन राज्याच्या सीमेलगत असल्याने विशेषत: सिमेलगत असणाऱ्या स्थिर सर्वेक्षण पथकाने वाहनांची कसून तपासणी करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गोवा राज्याने महाराष्ट्राच्या सीमेलगत कार्यान्वीत केलेल्या स्थिर सर्वेक्षण पथक (SST) टिमचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी डॉ. शिवप्रसाद खोत व त्यांची टिम उपस्थित होती. सदर प्रशिक्षणामध्ये जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी डॉ. शिवप्रसाद खोत यांनी गोवा राज्यातील SST टिम यांना निवडणूक खर्च संनियंत्रण या वरील अनुदेशांचा सारसंग्रहामध्ये नमूद करण्यात आलेल्या निर्देशानुसार काम करण्याबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री पाटील म्हणाले, कणकवली व सावंतवाडी विधानसभा मतदार संघ हे संवेदनशील मतदारसंघ ESCs (Empirical criteria - liquor) म्हणून घोषित करण्यात आले आहेत. पथकाला तपासणी दरम्यान, मतदारांना प्रलोभन दाखविण्याच्या प्रयोजनासाठी वापरण्याकरीता उमेदवार, त्यांच्या प्रतिनिधी किंवा पक्ष कार्यकर्ता वाहनातून रुपये ५० हजारहून अधिक रक्कम वाहून नेत असल्याचे किंवा रुपये दहा हजार पेक्षा अधिक मुल्यांची भित्तिपत्रके किंवा निवडणूक सामग्री किंवा कोणतेही आमली पदार्थ, दारु, शस्त्रे किंवा बक्षीस वस्तू नेत असल्याचे आढळून आल्यास किंवा वाहनात कोणेतेही अनूचित/निषिध वस्तू आढळून आल्यास ती जप्त करण्यात यावे व त्या संपूर्ण प्रसंगाचे व्हिडिओ चमूने व्हिडिओ चित्रण करावयाचे असून ते पथक व्हिडिओ सीडीची प्रत निवडणूक निर्णय अधिका-यास सादर करावी असेही ते म्हणाले. जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी श्री खोत म्हणाले, कोणताही प्रमुख (स्टार) प्रचारक केवळ त्याच्या/तिच्या वैयक्तीक वापराकरीता एक लाख रुपयापर्यंत रोख रक्कम पक्षाचा कोणताही कर्मचारी त्या रकमेचा उल्लेख करणारे पक्षाच्या कोषाध्यक्षाच्या प्रमाणपत्रासह नेत असल्यास आणि संपूर्ण वापर करीत असल्यास SST अधिकारी त्या प्रमाणपत्राची एक प्रत ठेवून घेतील व रोख रक्कम जप्त करणार नाहीत. जर तपासणी करताना वाहनात दहा लाखांहून अधिक रक्कम आढळून आल्यास आणि त्याबाबत कोणताही गुन्हा घडल्याचा संशय नसल्यास किंवा कोणत्याही उमेदवारांशी अथवा त्याच्या प्रतिनिधींशी अथवा पक्ष कार्यकर्ता/पदाधिकारी यांच्याशी संबंध नसल्यास SST रोख रक्कम जप्त करणार नाही आणि आयकर कायद्यानुसार आवश्यक कार्यवाहीसाठी ही माहिती आयकर प्राधिका-याकडे पाठविल असेही ते म्हणाले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांनी SSTs टिम यांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा व सुविधा यांच्या संदर्भात भारत निवडणूक आयोग व गोवा राज्यातील जिल्हाधिकारी यांचेशी पुढील पत्रव्यवहार करण्यात येईल असे सांगितले. तसेच SST B-10 या नमुन्यात आपला दैनिक अहवाल लेखापथक, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सिंधुदुर्ग यांना सादर करावा असेही ते म्हणाले. यानंतर गोवा राज्यातील SSTs टिम यांच्या समवेत वरील बाबींच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करुन त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'