पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते श्री क्षेत्र मोरयाचा धोंडा याठिकाणी शासकीय पूजा संपन्न
सिंधुदुर्गनगरी दि 25 (जिमाका) : मालवण किनारपट्टीवरील मोरयाचा धोंडा येथील किल्ले सिंधुदुर्गच्या पायभरणी सोहळ्याचा वर्धापन दिन सोहळा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उत्साही आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला. पालकमंत्री यांच्या हस्ते मोरयाचा धोंडा याठिकाणी शासकीय पूजा करण्यात आली. याचबरोबर किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरातील दररोज होणाऱ्या पुजेसाठी शासकीय यंत्रणांकडून आवश्यक ते सहकार्यही उभे केले जातील असे पालकमंत्री यांनी जाहीर केले.
मालवण येथे सिंधुदुर्ग किल्ला भुमिपूजन वर्धापन दिन सोहळा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी माजी खासदार निलेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली आदी उपस्थित होते.
श्री चव्हाण पुढे म्हणाले, 350 वर्षा पासून महाराजांचा इतिहास जपण्याचे काम गावातील सर्व मंडळींनी केले आहे. त्याच धर्तीवर राम राज्य, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जागृत ठेऊन देश महासत्तेच्या दिशेने नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. रामराज्य, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपल्याला जपायचा आहे. अनुभवायचा आहे. इतिहास हा अनेक बलिदानांवर उभा राहिलेला आहे. हा इतिहास जिवंतपणे पुढच्या पिढीपर्यंत जाणे आवश्यक आहे. अशाप्रकारच्या कार्यक्रमातून एक संदेश युवा पिढीपर्यंत नेणे गरजेचे आहे. भारत देश एकसंघ राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात अधिक मजबुत करण्याची वेळ आलेली आहे. गेल्या नऊ वर्षात पंतप्रधानांनी देशात निर्माण केलेला विश्वास आणि अखंड भारताचे दाखविलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री चव्हाण यांनी केले. नौदल दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान स्वतः सहभागी होणार आहे, यातून ते नौदलाचा सन्मान करण्यासाठी येत आहेत. सिंधुदुर्गवासियांनीही नौदल दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
सिंधुदुर्ग किल्ल्याचे साडेतीनशे वर्षांपूर्वी २५ नोव्हेंबर १६६४ रोजी मोरयाचा धोंडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी विधिवत भूमिपूजन केले होते. त्याच ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेल्या मोरयाचा धोंडा परिसराचा आता कायापालट होणार आहे. सुमारे आठ कोटी रूपये खर्चुन याठिकाणी पर्यटनस्थळ विकसीत करण्यात येणार आहे. साडेतीनशे वर्षे समुद्र उन-पाऊस आणि लाटांचा मारा झेलत असलेल्या 'मोरयाचा धोंडा'वर आता छत्र उभे राहत आहे. मालवणच्या पर्यटनाबरोबरच ऐतिहासिक दस्तावेजात एक नवी वास्तू या निमित्ताने समुद्रतिरी उभी राहत आहे. या वास्तूत छत्रपतींच्या विविध आठवणींबरोबरच किल्ले सिंधुदुर्ग निर्माण होत असतानाच्या अनेक संस्मरणीय नोंदी तसेच इतिहास सांगणारे म्युझियम उभे करण्यात येणार आहे. नौसेना दिन किल्ले सिंधुदुर्ग येथे होत असताना याची पायाभरणी झालेल्या स्थळावर एक इतिहास उभा राहत आहे. राज्याचे बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने इंडियन नेव्हीच्या पुढाकारातून यासाठी नौदलाचे कमांडर अभिषेक कारभारी, त्यांचे असिस्टंट मंगेश दळवी मेहनत घेत आहेत. एसएमपीएस कन्स्ट्रक्शनतर्फे पंकज शेलार यांनी या वास्तूची रचना केली आहे. या प्रकल्पाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.
मोरयाचा धोंडा देवस्थानमध्ये नियमीतपणे पुजाअर्चा आणि धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने करणारे मोरयाचा धोंडा परिसरातील बाबी उर्फ कृष्णा ढोके, बाबु जोशी, माजी सरपंच भाई ढोके, प्रकाश सावजी, सतीश चांदेरकर, बबन खोबरेकर, दामोदर तोडणकर, अशोक तोडणकर, दत्तात्रय नेरकर, देवराज जोशी, रमाकांत धुरी, नारायण तोडणकर, संजीव धुरी यांच्याबरोबर इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मोरयाचा धोंडा याठिकाणी पुजा करण्यासाठी असणारे पौरोहित्य करणाऱ्या भटजींची होते सहावी पिढी असणारे विलास अभ्यंकर यांनीच आज मोरयाचा धोंडा याठिकाणी धार्मिक कार्यक्रमात पौरोहित्य केले, त्यांचाही सत्कार पालकमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आला. मोरयाचा धोंडा या ऐतिहसीक ठिकाणाचा पर्यटन विकास करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल पालकमंत्र्यांचा स्थानिक ग्रामस्थांनी सत्कार केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी असलेल्याते हिरोजी इंदुलकर यांच्या कुटुंबातील तेरावे वंशज आहेत श्रीनिवास इंदुलकर हे उपस्थित राहिले होते, त्यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आला.
मोरयाचा धोंडा देवस्थानाबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत जोडलेल्या इतिहासाची माहिती ज्योती तोरसकर यांनी दिली. पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पालकमंत्री यांनी राजकोट आणि मोरयाचा धोंडा या ठिकाणाचा धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकास केल्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय केनवडेकर यांनी केले.
00000
Comments
Post a Comment