जिल्ह्यात २० नोव्हेंबर पासून कुष्ठरुग्ण शोध मोहिम

सिंधुदुर्गनगरी, दि.3 (जि.मा.का): केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये दि. २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२३ या कालावधीत " कुष्ठरुग्ण शोध (LCDC)" आणि "सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम (ACF)" राबविण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक संचालक, आरोग्य सेवाचे डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे. या मोहीमेच्या अनुषंगाने राज्यातील १०० टक्के ग्रामीण व शहरी भागातील जोखीमग्रस्त लोकसंख्या असणाऱ्या भागामध्ये कुष्ठरुग्ण शोध व सक्रिय क्षयरोग शोध मोहिमेचे सर्वेक्षण आशा स्वयंसेविका व पुरुष स्वयंसेवक यांच्या मार्फत सर्व लोकांची शारिरीक तपासणी करण्यात येणार आहे. या महत्वाकांक्षी मोहिमेचे उद्देश पुढीलप्रमाणे आहेत. संयुक्त कुष्ठरुग्ण शोध मोहिम व सक्रिय क्षयरुग्ण शोध उद्देश :- 'समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत औषधोपचाराखाली आणणे. नविन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराखाली आणून संसर्गाची साखळी खंडीत होऊन रोगाचा होणारा प्रसार कमी करणे. संशयित क्षयरुग्णांची थुंकी नमुने व एक्स रे तपासणी आवश्यकतेनुसार इतर तपासणी करुन क्षयरोगाचे निदान करणे आणि औषधोपचार सुरु करणे. समाजात कुष्ठरोग व क्षयरोग विषयी जनजागृती करणे. या मोहिमेसाठी एक आशा कार्यकर्ती / स्त्री स्वयंसेविका व एक पुरुष स्वयंसेवक अशा दोन लोकांची एक याप्रमाणे ८३६ टीम व १६९ पर्यवेक्षकांद्वारे एकूण ७,१८,३४७ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार असुन त्यांच्याद्वारे त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील लोकांची गृहभेटीद्वारे तपासणी करण्यात येणार असून या मोहिमेमध्ये घरोघरी पथकामार्फत कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. क्षयरोगाच्या बाबतीत TB आरोग्य साथी अॅप हे सर्वसामान्य लोकांसाठी तयार करण्यात आले आहे ते सर्वांनी डाऊनलोड करावे असे आवाहन पथकामार्फत करण्यात येणार आहे. तरी समाजातील सर्व स्तरावरिल व्यक्तींनी सदर मोहिमेदरम्यान आपल्या घरी येणाऱ्या पथकाकडुन कुष्ठरोग व क्षयरोगाविषयीची मोफत तपासणी करून घ्यावी यासाठी जिल्हा आरोग्य विभागामार्फत जाहीर आवाहन करण्यात येत आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'