खते, बियाणे, किटकनाशके खरेदी करताना दक्षता घ्या. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे शेतकऱ्यांना आवाहन

सिंधुदुर्ग, दिनांक 26 मे 2025 (जिमाका वृत्त) : सन 2025-26 खरीप हंगामासाठी जिल्ह्यात बियाणे व खते पुरवठा सुरु झालेला आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम हाच मुख्य हंगाम असून कृषी निविष्ठा खरेदीचा कालावधी देखील अत्यंत अल्प म्हणजे फक्त दोन-तीन महिन्याचा असतो. या बाबीचा विचार करता निविष्ठा खरेदी करताना शेतकऱ्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. आगामी खरीप हंगामात खते, बियाणे व किटकनाशके खरेदी करताना शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.. सन 2025-26 खरीप हंगाम चा आढावा घेण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जिल्ह्यातील सर्व बियाणे व खते उत्पादक कंपनी, जिल्ह्यातील अधिकृत निविष्ठा विक्रेते यांच्याबरोबर बैठक आयोजित केली होती. यावेळी, चुकीच्या पद्धतीने कृषी निविष्ठा विक्री करणारे विक्रेते कृषी विभागाच्या रडारवर असतील; कोणत्याही अवैध व्यवहाराला पाठीशी घातले जाणार नाही. अवैध पद्धतीने वागणाऱ्याना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल. शेतकऱ्यांना बनावट बियाणे, बनावट खते अथवा बनावट किटकनाशके विकणाऱ्या विक्रेत्यावर गुन्हे दाखल करु, कायदेशीर कारवाई करु तसेच परवाने निलंबित करू, असा इशाराही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, यांनी दिला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व निविष्ठा निरीक्षकांना कृषी विक्री केंद्रांची 100 टक्के तपासणी करण्याच्या आणि गुणवत्ता तपासणीसाठी तात्काळ निविष्ठा नमुने काढण्याच्या सुचनांदेखील यंत्रणेला दिल्या आहेत. तसेच जिल्हास्तर व तालुकास्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आलेली असून जिल्हास्तर व तालुकास्तरावर निविष्ठा तक्रारकक्ष देखील कार्यान्वित केलेला आहे. तसेच जिल्ह्यातील विक्रेतेनिहाय खत साठा सर्व शेतकरी नागरिकांसाठी कृषिक अॅप द्वारे उपलब्ध केलेला आहे. सर्व शेतकरी यांनी त्यांचे मोबाईल वर कृषिक अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. खते, बियाणे व किटकनाशके खरेदी करताना शेतकऱ्यांनी अत्यंत जागरूक राहिले पाहिजे, कृषी निविष्ठा अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडून खरेदी कराव्यात. या निविष्ठा खरेदी करताना त्यावर लिहिलेली पॅकिंग तारीख, अंतिम तारीख, लेबल क्लेम इ. बाबी तपासून घ्याव्यात. याशिवाय परिपूर्ण असलेले खरेदीचे पक्के बिल संबंधित विक्रेत्याकडून न चुकता घ्यावे व ते जपून ठेवावे. बियाणे पेरणी करतांना पाकिटावरील लेबल, पाकीट व थोडे बियाणे बाजूला काढून जपून ठेवावे. अनुदानित रासायनिक खते खरेदी करताना आधार कार्ड लिंक करूनच खरेदी करावी जादा दराने खते, बियाणे खरेदी करू नयेत. जादा दराने तसेच बनावट खते/बियाणे विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विक्रेत्यांची माहिती कृषी विभागाच्या तक्रार कक्षाशी संपर्क करावा. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'