उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जि.मा.का.) : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग, शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालय, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग आणि शिक्षण विभाग, पंचायत समिती, कणकवली यांच्या वतीने आयोजित उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा व कणकवली तालुकास्तर उल्लास मेळावा २०२४-२५ पोदार इंटरनॅशनल स्कूल, कणकवली येथे संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मेळाव्यात राज्य समन्वयक राजेश क्षीरसागर, नव भारत साक्षरता कार्यक्रम तथा विभागीय अध्यक्ष कोल्हापूर विभागीय मंडळ प्रदीपकुमार कुडाळकर, कार्यक्रम व्यवस्थापक, राज्य शाळा मानक प्राधिकरण, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे अरुण चव्हाण, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, कणकवली या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. पोदार एज्युकेशन ट्रस्ट कोल्हापूर हबचे जनरल मॅनेजर कर्नल शिरीष कुलकर्णी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मेळाव्याच्या सुरूवातीला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कायकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्या शुभहस्ते फीत कापून तालुका व केंद्रनिहाय शैक्षणिक साहित्यांच्या स्टॉल्सचे उद्घाटन करण्यात आले. या मेळाव्यात आठही तालुक्यातून प्रत्येक तालुक्याचा एक याप्रमाणे आठ स्टॉल आणि कणकवली तालुका मेळाव्याच्या निमित्ताने कणकवली तालुक्यातील २२ केंद्रातून आलेल्या स्टॉल्समध्ये शिक्षकांच्या सर्जनशीलतेने अनेक प्रकारचे निर्माण केलेल्या शैक्षणिक साहित्यांची मांडणी करण्यात आली होती. उद्घाटनानंतर मान्यवरांनी सर्व स्टॉल्सची पाहणी करून स्टॉलधारक शिक्षक, केंद्रप्रमुख यांच्याशी संवाद साधला. स्टॉल्स पाहणीनंतर सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात राज्यगीताने व त्यानंतर परमपूज्य भालचंद महाराज विद्यालय, कणकवली क्र. ३ च्या विद्यार्थी कलाकारांनी ईशस्तवन आणि स्वागतगीत गायनाने झाली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व गटशिक्षणाधिकारी सर्व विस्तार अधिकारी सर्व केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना प्रतिनिधी आणि पत्रकार बंधू यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्गचे प्राचार्य राजेंद्र कांबळे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या उल्लास - नव भारत साक्षरता कार्यक्रमाची पार्श्वभूमी आणि गेल्या दोन वर्षांत झालेल्या कामकाजाचा घेतला. सन 2023-24 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात 256 असाक्षरांची नोंदणी होऊन दि.17 मार्च 2024 रोजी पार पडलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान परीक्षेस 225 असाक्षर प्रविष्ठ होऊन उत्तीर्ण झाले. सन 2024-25 वर्षात आजअखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 6010 इतक्या असाक्षरांची नोंदणी झाली आहे. राज्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यास चालू वर्षात दिलेल्या 4496 इतक्या उद्दिष्टाच्या प्रमाणात सुमारे 133 टक्क्यांपेक्षा जास्त काम केले. त्यामध्ये कुडाळ वगळता इतर 7 तालुक्यांनी 100 टक्के अथवा त्यापेक्षा अधिक उद्दिष्ट साध्य केले आहे. यानंतर 100 टक्के अथवा त्यापेक्षा अधिक उद्दिष्ट साध्य केलेले गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी तसेच नवसाक्षर, स्वयंसेवक यांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यात सर्वात जास्त उद्दिष्ट साध्य केलेले प्रथम वैभववाडी २११टक्के, दोन कणकवली १५४ टक्के, तीन देवगड १४५ टक्के, चार दोडामार्ग १३३टक्के, पाच मालवण १२६टक्के, सहा वेंगुले तालुका १२६ टक्के आणि सात सावंतवाडी १०० टक्के या तालुक्यांचा सन्मान करण्यात आला. या सन्मानानंतर प्रातिनिधीक स्वरूपात गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, नवसाक्षर श्रीमती शारदा सहदेव चव्हाण आणि स्वयंसेवक कु. सुहानी सत्यवान परब यांनी मनोगत व्यक्त केले. यात स्वयंसेवक कु.सुहानी यांनी आतापर्यंत असाक्षरांना साक्षर करत असताना कोणकोणते प्रयत्न करावे लागले, याबाबतचे अनुभव विषद केले. पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या राणी मारिया झेवियर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सादरीकरण केले. यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव भारत साक्षरता कार्यक्रमाची सुरूवात केलेले तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, सध्याचे कार्यक्रम व्यवस्थापक, राज्य शाळा मानक प्राधिकारण, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रेरणेने कार्यक्रमास चालना मिळाल्याचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमामध्ये कोल्हापूर विभागीय मंडळ श्री, राज्य समन्वयक, नव भारत साक्षरता कार्यक्रम तथा विभागीय अध्यक्ष.राजेश क्षीरसागर यांनी आपले विचार मांडले. सिंधुदुर्ग जिल्हा गतवर्षी नव भारत साक्षरता कार्यक्रमात राज्यात सर्वात मागे होता. त्यामानाने यावर्षी दिलेल्या उद्दिष्ट 133 टक्के साध्य करून राज्यात आघाडीच्या जिल्ह्यांत समावेश झाल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व सहभागी घटकांचे अभिनंदन केले. तसेच मागील वर्षीची उणीव भरून काढण्यासाठी यापुढेही जास्तीत जास्त असाक्षरांची उल्लास ॲपवर नोंदणी करावी. त्याचप्रमाणे आवश्यक स्वयंसेवकांची नोंदणी व त्यांचे असाक्षरांशी टॅगिंग करण्यात यावे. माहे फेब्रुवारी 2025 मध्ये होणाऱ्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान परीक्षेसाठी जास्तीत जास्त असाक्षरांना प्रविष्ठ करण्यात यावे. असाक्षरांचे अध्ययन अध्यापन वर्ग नियमित सुरू राहून राज्य साक्षरता केंद्राकडून प्रसारित करण्यात आलेल्या सराव प्रश्नपत्रिकांचा सराव घेण्याबाबत सूचना दिल्या. तसेच मागील वेळी झालेल्या साक्षरता अभियानाप्रमाणेच सध्या सुरू असलेल्या कार्यक्रमात देखील सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात सर्वप्रथम साक्षर जिल्हा घोषित होईल, याबाबत आवश्यक प्रयत्न करून कामकाज पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना, शासनाची या कार्यक्रमाबाबत आतापर्यंतची भूमिका, त्यामध्ये शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचा लाभलेला सहकार्य आणि त्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आतापर्यंत झालेले तसेच यापुढे होणारे काम याबाबत भूमिका मांडली. भविष्यकाळामध्ये देखील सिंधुदुर्ग जिल्हा त्याच उमेदीने हे काम पूर्ण करत असताना शासनाचा हा कार्यक्रम पूर्ण करेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या कोल्हापूर हबचे जनरल मॅनेजर कर्नल शिरीष कुलकर्णी यांनी त्यांचे विचार मांडले. या प्रकारचा मेळावा या पोदार स्कूलमध्ये होत असल्याबाबत शासनाला धन्यवाद दिलेत आणि शासनाच्या अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांना नेहमीच पोदार सहकार्य करेल अशा प्रकारचे आश्वासन दिले. मेळाव्याच्या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक शामसुंदर सावंत यांनी केले. उद्घाटन समारंभाच्या शेवटी शिक्षणाधिकारी (योजना) श्रीमती निलिमा नाईक यांनी या संपूर्ण मेळाव्यासाठी आणि नव भारत साक्षरता कार्यक्रमासाठी ज्या ज्या घटकांचे सहकार्य लाभले, त्या सर्वांचे शब्द सुमनांनी आभार व्यक्त केले. दुपारच्या सत्रात जिल्ह्यातील तालुक्यांच्या वतीने सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात फुगडी, पथनाट्य, नाटिका, गायन, नृत्य अशा विविध कलांच्या माध्यमातून नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसारासाठी करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमांचा उपस्थितांनी आस्वाद घेतल्यानंतर सर्व सहभागी उपस्थितांचे प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येऊन मेळाव्याची सांगता करण्यात आली. या मेळाव्याचे आयोजन लोकसहभागातून करण्यात आले. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'