जिल्हा प्रशासन, जिल्हा परीषद आणि पोलिस प्रशासनाचा घेतला आढावा सर्वसामान्यांची कामे प्रशासनाने त्वरित मार्गी लावावीत -पालकमंत्री नितेश राणे
• कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य द्यावे
•जिल्हा परीषदेचा निधी अखर्चित राहता कामा नये
•नागरिकांच्या कामाला प्राधान्य द्या
सिंधुदुर्ग दि २५ (जिमाका) शासन जतनेच्या कल्याणासाठी विविध योजना राबवित आहे. या योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्वसामान्यांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा. तसेच अधिकाऱ्यांनी सामान्य जनतेच्या कामांना प्राधान्य देऊन त्यांची कामे कमीत कमी वेळेत करुन देण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महसूल प्रशासन, जिल्हा परीषद प्रशासन, पोलिस प्रशासनाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री नितेश राणे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल , अपर अधिक्षक कृषिकेश रावले तसेच सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसीलदार सर्व महसूल खातेप्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, सरकारची प्रतिमा ही महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवरून ठरते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी नेमून दिलेली कामे प्रभावीपणे करावीत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवावा. सामान्य नागरिकांचे एकही काम प्रलंबित राहता कामा नये. सामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय आणि काम वेळेत होईल याची काळजी घ्या. जनतेला कोणत्याही कामासाठी फेऱ्या माराव्या लागू नयेत. मला प्रशासन फक्त चालवायचे नाही तर पळवयाचे आहे. प्रशासनात शिस्त आणण्याची आवश्यकता आहे. महसूल वसुलीचे उदिृष्ट पूर्ण करा. भ्रष्टाचार आणि कामात हयगय करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार. आपल्या जिल्ह्यात आगामी काळात नवीन प्रकल्प उभे राहणार आहेत. या उद्योगांच्या यशस्वीतेमध्ये अधिकारी म्हणून तुमचे योगदान महत्वाचे आहे. आपला जिल्हा दरडोई उत्पन्नात पहिल्या ५ मध्ये आणायचा आहे. जिल्हा परीषदेला विविध विकासकामांसाठी शासनातर्फे निधी मिळतो हा निधी वेळेत खर्च होणे अपेक्षित आहे. परंतु असे होताना दिसत नाही ही बाब गंभीर आहे. जिल्हा परीषदेचा निधी अखर्चीत राहू नये यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे असेही ते म्हणाले.
कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य राहणार आहे. कोणतेही अवैध धंद्ये जिल्ह्यात खपवून घेतले जाणार नाही. असे धंदे निदर्शनास आले तर पोलिस प्रशासनाने देखील कडक कारवाई करावी. अंमली पदार्थ, अवैध दारु, मटका, जुगार अशा सर्व धंद्याविरोधात पोलिस प्रशासनाने विशेष मोहिम राबवावी व त्या विरोधात कडक करवाई करावी असे आदेश पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. गावातील अवैद्य दारूचे अड्डे आणि दारू विक्री बंद करा. असे अवैध धंदे बंद केल्यात जनता स्वतःहून पोलिस प्रशासनाचे गावोगावी सत्कार करतील असेही ते म्हणाले.
देशाची सागरी सुरक्षा म्हत्वाची आहे. आपल्या जिल्हाला सन २०१४ मिळालेल्या ९ बोटी कालबाह्य झाल्या आहेत. १० अद्ययावत स्पीड (स्टील) बोटी मिळाव्यात यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत चर्चा झाली असून पुढील पाठपुरावा सुरू आहे. पोलिसांच्या निवासस्थानांच्या दुरुस्तीसाठी आणि वाहनांसाठी निधीची तरतुद करणार. कोकणात येणाऱ्या प्रकल्पांची प्राथमिक माहिती ग्रामसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाने जनतेमध्ये द्यावी. विकासात्मक प्रकल्पांना राजकिय विरोध होणार नाही याची काळजी घ्यावी. असा सूचनाही यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या.
००० ०००
Comments
Post a Comment