शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि. 17 (जिमाका) :- शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फत बीज भांडवल कर्ज योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना अशा योजना राबविल्या जातात. तरी इच्छुक व गरजू इतर मागासवर्गीय ओबीसी प्रवर्गातील पात्र उमेदवारांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी केले आहे. शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत सेनानी महाराज केशशिल्पी महामंडळ व संत काशिबा गुरव युवा विकास महामंडळाच्या योजनांची माहिती खालीलप्रमाणे आहे. बीज भांडवल कर्ज योजना, ऑफलाईन योजना या योजनेत कर्जाची मर्यादा ही रु. 5 लक्ष इतकी आहे. उमेदवाराचे वय 18 ते 50 पर्यंत असणे आवश्यक आहे. कर्जाच्या परतफेडीचा कालवधी मुदत 5 वर्षे आहे. या योजनेमध्ये महामंडळाचा सहभाग 20 टक्के, बँकेचा सहभाग 75 टक्के व लाभार्थी सहभाग हा 5 टक्के असतो. महामंडळाच्या सहभागावरील कर्ज रकमेवर द.सा.द.शे 6 टक्के व्याज आकारले जाते . सन 2024-25 करीत योजनेकरीता एकूण 29 भौतिक उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या योजनेचे सर्व महामंडळाचे कर्ज अर्ज जिल्हा कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. थेट कर्ज योजना (रूपये 1.00 लक्ष पर्वत) ऑफलाईन योजना या योजनेत कर्जाची मर्यादा रु. 1.00 लक्ष इतकी आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी 4 वर्षे आहे. महामंडळाकडून दिलेल्या कर्जाचे नियमित हप्ता भरणा केल्यास या कर्ज बिनव्याजी प्रमाणे परतफेड करता येते. या करीता उमेदवाराचे वय 18 ते 55 दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच तहसिलदार यांनी निर्गमित केलेला उत्पन्नाची मर्यादा रु. 1.00 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. सन 2024-25 या वर्षाकरीता थेट योजनेचे भौतिक उद्दीष्ट 114 असून आर्थिक उद्दिष्ट रु. 114.00 लक्ष देण्यात आले आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना- ऑनलाईन योजना या योजनेत कर्जाची मर्यादा रु.10.00 लक्ष असून ही योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत व्यावसायिक वाहनांकरीता नवीन व्यवसाय सुरु करण्याकरीता तसेच व्यवसाय वाढीकरीता कर्जाची मागणी करता येते. महामंडळाच्या प्रक्रियेनंतर कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्यास 12 टक्के पर्यंतचा व्याज लाभार्थीच्या बचत खात्यात जमा करण्यात येणार आहे. उमेदवाराचे वय 18 ते 50 वयोगटातील असणे आवश्यक आहे. योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.msobcfdc.org या महामंडळाच्या वेबसाईट वर नावनोंदणी करून सादर करावयाचे आहेत. सन 2024-25 करीता योजनेकरीता एकूण 115 भौतिक उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. गट कर्ज व्याज परतावा योजना- ऑनलाईन योजना या योजनेची मर्यादा रू.10.00 लक्ष ते रु. 50.00 लक्ष इतकी असून बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत नोंदणी असलेले, LLP,FPO अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थांना बँकेमार्फत स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरीता कर्ज दिले जाते. या योजनेकरीता उमेदवाराचे वय 18 ते 45 इतके असणे आवश्यक आहे. महामंडळाच्या निकषांनुसार विहीत केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील संस्थांकरीता अर्ज सादर करता येतील. योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.msobcfdc.org या महामंडळाच्या वेबसाईट मध्ये नावनोंदणी करूम सादर करावयाचे आहेत. सन 2024-25 करीता योजनेकरीता एकूण 10 भौतिक उहिष्ट प्राप्त झाले आहे. शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना- ऑनलाईन योजना या योजनेअंतर्गत उच्य शिक्षणासाठी राज्य देशांतर्गत आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी/ विद्यार्थिनीना बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रक्कमेवरोल व्याजाचा परतावा दिला जातो. यामध्ये राज्यांतर्गत व देशांतर्गत रू.10.00 लक्ष पर्यंत व परदेशी शिक्षणाकरीता रू. 20.00 लक्ष इतके कर्जावरील व्याजाचा परतावा दिला जातो. विद्यार्थ्यांचे वय 17 ते 30 वर्षे असावे. अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.8.00 लक्ष पर्यंत असावी. अर्जदार इयत्ता 12 वी मध्ये 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. यामध्ये आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावयायिक अभ्यासक्रम व व्यवस्थापन, कृषी. अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान इ. अभ्यासक्रमाकरीता अर्ज सादर करता येतील. या कर्जामध्ये शैक्षणिक शुल्क, पुस्तके साहीत्य खरेदी व भोजन खर्च व राहण्याचा खर्च इ समावेश असेल. सन 2024-25 करीता योजनेचे भौतिक उद्दिष्ट एकूण 37 इतके प्राप्त झाले आहे. महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना- या योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचलित साधन केंद्र CMRC यांच्या सहाय्याने राबविण्यात येत आहे. यामध्ये महिला बचत गटातील इतर मागास (ओबीसी) महिलांनी उत्पादीत केलेल्या उद्योगांकरीता बँकामार्फत मंजूर करण्यात आलेल्या रूपये 5.00 ते 10.00 लक्ष पर्यंतच्या कर्ज रक्कमेवरील 12 टक्के व्याजाच्या मर्यादित व्याज परतावा उपलब्ध करून देण्यात येतो. या बचत गटातील महिला उमेदवाराचे वय 18 ते 60 वर्ष असावे. गटातील किमान 50 टक्के महिला या इतर मागास प्रवर्गातील असणे आवश्यक आहे तसेच जातीचा दाखला असणे आवश्यक आहे. वरील सर्व योजनांकरीता पात्र उमेदवाराकडे इतर मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे. इच्छुक व गरजू इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील व्यक्तीनी योजनेच्या अधिक माहितीकरीता शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ए विंग, सिंधुदुर्गनगरी ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग (दुरध्वनी क्रमांक ०२३६२ २२८११९) पत्त्यावर संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. ००००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'