राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीच्या माध्यमातून एकाच दिवशी 1 हजार 125 प्रकरणे निकाली

सिंधुदुर्गनगरी दि. 16 (जिमाका) :- राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीच्या माध्यमातून एकाच दिवशी 1 हजार 125 प्रकरणे निकाली काढण्यात आले. या प्रकरणातील एकूण तडजोडीची रक्कम रुपये 3 कोटी 45 लाख 71 हजार अशी आहे. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोड झालेल्या प्रकरणांमध्ये समजोता होऊन निकाल झाल्याने त्यांच्यातील सामंजस्य व जिव्हाळा टिकून राहिला आहे. तसेच तडजोडीच्या निकालांविरुध्द अपील होत नसल्याने त्यांच्या वेळेची व पैशाची बचत झाली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एच .बी. गायकवाड,यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये व जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय लोक अदालतीसाठी सर्व तालुका न्यायालयात प्रत्येकी एक पॅनेल तसेच जिल्हा न्यायालयात दोन पॅनेल नेमण्यात आले होते. पॅनेल क्र.1 मध्ये जिल्हा न्यायाधीश-1 श्रीम. एस. एस. जोशी व अति. सत्र न्यायाधीश, सिंधुदुर्ग व विधीज्ञ संकेत नेवगी यांनी काम पाहिले. पॅनेल क्र.2 मध्ये दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) श्रीम. व्ही. आर. जांभुले, व मुख्य न्यायदंडाधिकारी, सिंधुदुर्ग व विधीज्ञ श्रीम. सुमन एस. गावडे यांनी काम पाहिले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव, श्रीम. एस. के. कारंडे हे राष्ट्रीय लोक अदालतीसाठी उपस्थित होत्या. पॅनेल समोर दिवाणी दावे, तडजोडपात्र स्वरुपाची फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, धनादेशाबाबतची प्रकरणे, कर्ज वसुली प्रकरणे व सर्व प्रकारची वादपुर्व प्रकरणे तडजोड होऊन निकाली झाली. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये पक्षकार व विधीज्ञ यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयातील सर्व न्यायिक अधिकारी व कर्मचारी यांनी सुमारे दोन महिन्यांपासून परिश्रम घेतले होते. पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच अन्य शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये महत्त्वपूर्ण सहभाग घेतला होता. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'