'महिला आयोग आपल्या दारी' महिलानी पुढाकार घेत आपल्या तक्रारी मांडण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि. 11 (जिमाका) :- राज्य महिला आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत सिधुदुर्ग जिल्ह्यातील तक्रारीची जनसुनावणी गुरुवार दि. 19 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे सकाळी 11 वाजता होणार आहे. आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर आणि सदस्य सचिव श्रीमती माया पाटोळे तक्रारीची सुनावणी घेणार आहेत. जिल्ह्यात या जनसुनावणीत महिलानी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा, श्रीमती रुपाली चाकणकर यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा, श्रीमती रुपाली चाकणकर दि. 19 डिसेंबर 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत, महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारी' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारीचें निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणी नंतर महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोपर्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर सर्व यंत्रणेनिशी जात आहे. "महिला आयोग आपल्या दारी" अंतर्गत जनसुनावणीला पोलिस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोग करत आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'