नवभारत साक्षरता कार्यक्रम चाचणी परीक्षा 17 मार्च रोजी
सिंधुदुर्गनगरी, : केंद्रपुरस्कृत उल्लास - नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत उल्लास ॲपवर नोंदणी झालेल्या असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी महाराष्ट्रसह संपुर्ण देशात एकाच वेळी रविवार दि. 17 मार्च 2024 रोजी ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.
राज्यात आतापर्यंत सहा लक्ष वीस हजार इतक्या असाक्षरांची ऑनलाइन नोंदणी केंद्रशासनाकडे झाली असून त्या सर्वांची परीक्षा घेण्याची प्रशासनाने तयारी केली आहे. दरम्यान 5 लाखाहून अधिक नवसाक्षर ही परीक्षा देतील असा अंदाज आहे. सध्या दहावी- बारावीच्या परीक्षांसह इतरही विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे नातवंडांसह आजी ‘ आजोबाही अभ्यासात सध्या मग्न आहेत.
उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम सन 2022 ते सन 2027 या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. देशातील 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसीत करून देशातील 15 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील असाक्षर व्यक्तींना महत्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसीत करावयाची आहेत. या कौशल्यांमध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण, इ. बाबींचा समावेश आहे. स्थानिक रोजगार, पुनर्कुशलता आणि उच्च कौशल्य प्राप्त करण्याच्या दृष्टीकोनातून प्रौढ नवसाक्षरांसाठी निरंतर शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून देशातील 15 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये विकसीत करता येतील. त्याची अंमलबजावणी केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश स्तरावरील संबंधित मंत्रालये / विभागांच्या सहाय्याने केली जात आहे.
महाराष्ट्राने दि.१४ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे ही योजना स्वीकारली आहे. तसेच शासन निर्णय दि.२५ जानेवारी २०२३ नुसार या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, गटस्तरीय, शाळास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हा नियामक परिषदेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत व जिल्हा कार्यकारी समितीचे अध्यक्ष हे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आहेत. तसेच तालुकास्तरावर तहसीलदार व गटविकास अधिकारी हे अनुक्रमे तालुका नियामक आणि तालुका कार्यकारी समितीचे अध्यक्ष आहेत. शाळास्तरावर शाळा व्यवस्थापन समिती / शाळा व्यवस्थापन व विकास समिती यांच्यावर या कार्यक्रमाची जबाबदारी आहे. या योजनेत शाळा हे एकक आहे.
या परीक्षेच्या अनुषंगाने केंद्राचे निरीक्षक अवर सचिव प्रदीप हेडाऊ दि. १६ ते १८ मार्च २०२४ या कालावधीत महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी ही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी निरीक्षक म्हणून नेमण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमांतर्गत ज्या शाळेतून उल्लास ॲपवर असाक्षर व्यक्तींची नोंदणी केलेली आहे. ती प्रत्येक शाळा परीक्षा केंद्र असणार आहे. नोंदणीकृत असक्षरांनी रविवार दिनांक १७ मार्च २०२४ रोजी त्या शाळेमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ०५ या वेळेत जाऊन पायाभूत चाचणी परीक्षा द्यावी. तसेच सदर नोंदणीकृत असाक्षर व्यक्तींना परीक्षा केंद्रावर उपस्थित ठेवण्यासाठी शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्र प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, स्वयंसेवक यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत, असे आवाहन शिक्षण संचालनालय (योजना) कडून करण्यात आले आहे.
परीक्षेस जाताना असाक्षर व्यक्तीने स्वतःचा एक आयकार्ड साईज फोटो नोंदणी फॉर्मवर लावण्यासाठी आणावा (फोटोबाबतची सक्ती नाही). तसेच जन्मतारखेचा पुरावा म्हणून असाक्षर व्यक्तीने स्वतःचे मतदान ओळखपत्र/ आधारकार्ड / पॅनकार्ड / बँक पासबुक इत्यादीपैकी कोणतेही एक ओळखपत्र आणणे आवश्यक आहे,जेणेकरुन उत्तरपत्रिकेतील प्रथम पानावरील माहिती भरणे तसेच असाक्षर व्यक्तींचा परीक्षा नोंदणी अर्ज भरणे शक्य होईल.
प्रश्नपत्रिका ही पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याच्याशी संबंधित पुढील तीन भागांमध्ये विभागलेली असून एकूण १५० गुणांची आहे. अनुक्रमे भाग-क (वाचन) ५० गुण, भाग-ख (लेखन) ५० गुण, भाग-ग (संख्याज्ञान) ५० गुण असे आहेत. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी ३३ टक्के (१७ गुण) अनिवार्य आहेत व एकूण १५० गुणांपैकी ३३ टक्के (५१ गुण) अनिवार्य असतील. कोणत्याही एका भागाचे ३३ टक्के गुण होण्यासाठी कमी पडलेले जास्तीत जास्त ५ वाढीव गुण देता मिळू शकतील, परंतु तीनही भागाचे मिळून ५ पेक्षा जास्त ग्रेस गुण देता मिळणार नाहीत.
परीक्षेची वेळ सकाळी १०ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असेल. प्रत्यक्ष पेपरचा कालावधी ३ तासांचा असेल. (दिव्यांग व्यक्तींसाठी ३० मिनिटे जादा वेळ) परीक्षार्थी या परीक्षेसाठी वरील कालावधीत कधीही येऊ शकेल.
योजना शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी सांगितले की, परीक्षा ऑफलाईन पध्दतीने होईल म्हणजे परीक्षार्थीस पेपरची हार्ड कॉपी देण्यात येईल. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकत्रित असेल, मराठी माध्यमातून परीक्षा आयोजित करणेत येईल. अपवादात्मक परीक्षा केंद्रांवर इतर माध्यमांचे परीक्षार्थी आल्यास त्याबाबतची व्यवस्था शिक्षणाधिकारी (योजना) यांचेकडून करण्यात येत आहे.
उत्तरपत्रिकेतील माहिती व उत्तरे लिहिण्यासाठी फक्त काळ्या किंवा निळ्या शाईचा पेन वापरावा. पेन्सिल अथवा इतर रंगाची शाई असलेला पेन वापरु नये, अशा सूचना आहेत.
यु-डायस क्रमांकानुसार असाक्षरांची नोंदणी केलेली प्रत्येक शाळा ही परीक्षा केंद्र असेल. त्यामुळे नजीकच्या केंद्रावरच परीक्षा देण्यासाठी नवसाक्षरास जावे लागेल.
परीक्षेसाठी उल्लास ॲपवरील नोंदणीकृत असाक्षर व्यक्तीच परीक्षा देण्यास पात्र असेल. उल्लास ॲपवर ऑनलाईन नोंदणी केलेली नसल्यास परीक्षा देता येणार नाही. सदरची परीक्षा ही प्रौढांची असल्याने तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि इतर महत्वाच्या बाबींसाठी पूरक असल्याने परीक्षा केंद्रावरील वातावरण या परीक्षार्थीसाठी आनंदाचे व उत्साहाचे ठेवण्याची जबाबदारी क्षेत्रीय यंत्रणेतील प्रत्येक घटकाची आहे. परीक्षा केंद्रावरील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा असाक्षरतेबद्दलचा दृष्टीकोन सहानुभूतीचा व मदतीचा असावा. म्हणजे परीक्षा शिस्तबध्द पध्दतीने घेण्यात येत असली तरी परीक्षार्थीसाठी वातावरण खेळकर असावे. जेणकरुन परीक्षार्थीवर कसल्याही प्रकारचा ताण येणार नाही, अशाही सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना योजना शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आल्या आहेत.
परीक्षा कामकाजात अडथळे आणणाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याच्या सूचना शिक्षण संचालनालय (योजना) मार्फत केंद्रसंचालकांना दिल्या आहेत. तसेच परीक्षा कामकाजात कूचराई करणारांवरही विविध नियमांखाली कारवाई होणार आहे.
ही परीक्षा विहित निकषानुसार उत्तीर्ण झाल्यानंतर नवसाक्षरांना केंद्रशासनाकडून प्रमाणपत्र/ गुणपत्रक देण्यात येणार आहे. या परीक्षेच्या माध्यामातून व्यक्तीमध्ये विविध जीवनकौशल्ये विकसित होतील. तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. तसेच दैनंदिन जीवन जगत असताना स्वतःच्या कुटुंबात,पाहुणे, नातेवाईक यांच्यामध्ये आपले कौतुक होईल. वेगवेगळया दुकानांमध्ये वस्तुची खरेदी करणेसाठी गेले असता फसवणूक होणार नाही. बँक/ पोस्ट ऑफिस इ. ठिकाणी आर्थिक व्यवहारामध्ये फसवणूक होणार नाही.
राज्यात सद्यस्थितीत दि.१३ मार्च २०२४ पर्यंत ६,२१,४६२ इतक्या असाक्षरांची नोंद उल्लास ॲपवर ऑनलाईन पध्दतीने झालेली आहे. उल्लास ॲपवर नोंदणीकृत सर्व असाक्षरांची परीक्षा घेण्याबाबत जिल्हयांना सूचना शिक्षण संचालनालय (योजना) कार्यालयामार्फत देण्यात आल्या आहेत.
रविवार दि.१७ मार्च २०२४ रोजी होणाऱ्या या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त असाक्षरांची नोंदणी उल्लास ॲपवर नोंदणी करून त्यांना या परीक्षेसाठी प्रविष्ठ करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा, जिल्हास्तर नियामक परिषद अध्यक्ष किशोर तावडे व डॉ.उदय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तथा अध्यक्ष, जिल्हास्तर कार्यकारी समिती, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment