पोलिओ निर्मुलन, जागतिक शांतता आणि
कोविड रूग्णांचा आत्मविश्वास वाढविण्याचे कार्य कौतुकास्पद
---जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 24 : रोटरी इंटरनॅशनलचे पोलिओ निर्मुलन व जागतिक शांततेसाठीचे कार्य खुपच मोठे आहे. कोरोना महामारीच्या काळात रोटरी क्लब ऑफ कुडाळचे कोविड रूग्णांचा आत्मविश्वास वाढवणारे कार्य कौतुकास्पद असून जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्व रोटेरियन्स व डॉक्टर्स यांचे अभिनंदन जिल्हाधिकारी के. मजुलक्ष्मी यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ कुडाळने कोविड योध्दयाप्रमाणे रोटरी उमेद होम आयसोलेशन काऊंन्सलिंग कार्यक्रम, युध्द कोरोनाशी एक जनजागृती, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन्स, मेडिकल साहित्य वाटप, असे विविध उपक्रम राबवित सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासाला मोलाचे सहकार्य केले आहे, असे गौरवोद्गार सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीने कुडाळ सायकल क्लब, रेन्बोरायडर्स सुकळवाड, ब्युटीज ऑन व्हिल्स कट्टा यांच्या संयुक्त भव्य रोटरी पोलिओ जनजागृती सायकल रॅलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय सर्कल सिंधुदुर्गनगरी येथे स्वागत करताना व्यक्त केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष सचिन मदने, उपजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 असिस्टंट गव्हर्नर प्रणय तेली, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे माजी अध्यक्ष गजानन कांदळगावकर, राजन बोभाटे, प्रमोद भोगटे, सचिव अभिषेक माने, खजिनदार अमित वळंजू, राजेंद्र केसरकर, एकनाथ पिंगुळकर, राजू पवार, अभिजित परब, राकेश म्हाडदळकर, रेन्बोरायडर्सचे डॉ बापू परब, डॉ सोमनाथ परब, डॉ सिध्दांत परब, दै तरूण भारतचे जिल्हा आवृत्तीप्रमुख शेखर सामंत,आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण जगात रोटरीने 1988पासून पोलिओ निर्मुलन चा इतिहासातील सर्वात मोठा उपक्रम यशस्वी करताना 99.9% जग पोलिओमुक्त केले आहे. दरवर्षी जगभरात 40कोटी बालकांना 1.50लाख रोटरी आरोग्य मित्राद्वारे घरोघरी पोलिओ लस दिली जाते. आतापर्यंत रोटरीने पोलिओ निर्मुलन साठी 1 लाख 98 हजार 111 कोटी 15 लाख रूपये खर्च केला आहे. रोटरीचे हे महान कार्य जनसामान्यांपर्यंत पोहचावे यासाठी 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिनानिमित्त जगभरात रोटरीमार्फत विविध जनजागृती अभियान राबविले जात आहे.
रोटरी क्लब ऑफ कुडाळ ने रोटरी पोलिओ जनजागृती अभियानांतर्गत कुडाळ सायकल क्लब, रेन्बो रायडर्स सुकळवाड, ब्युटी ऑन व्हिल्स कट्टा यांच्या सहकार्याने भव्य सायकल रॅलीचे आयोजन केले होते. ही सायकल रॅली पहाटे 5.30 वाजता मराठा समाज सभागृह कुडाळ येथून सुरू झाली. कुडाळ पोस्ट ऑफिस, एस टी डेपो, जिजामाता चौक ओरोस, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय सर्कल, ओरोस फाटा, कुडाळ बाजारपेठ मार्गे मराठा समाज सभागृह कुडाळ या मार्गाने अतिशय सुंदर व निटनेटक्या नियोजनात संपन्न झाली. या सायकल रॅलीमध्ये एकूण 50 सायकलपटू सहभागी झाले होते. सदर सायकल रॅलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय सर्कल सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी स्वागत करत स्वतः सायकलसह सहभागी झाल्या. यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीने जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांचे कोविड योध्दा गौरवपत्र, चंदनाचे वृक्ष देऊन अध्यक्ष सचिन मदने यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत, डॉ बापू परब, डॉ सोमनाथ परब, डॉ. श्रीपाद पाटील आदींचा सत्कार करण्यात आला.
कुडाळ पोस्ट ऑफिस येथे सदर रॅलीमध्ये कुडाळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शंकरराव कोरे सहभागी झाले. मराठा समाज सभागृह कुडाळ येथे रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी पोलिस निरीक्षक शंकरराव कोरे यांचा रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या वतीने अध्यक्ष सचिन मदने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलिस निरीक्षक शंकरराव कोरे यांच्याहस्ते रोटरी पोलिओ जनजागृती कॅपचे वाटप करण्यात आले. कुडाळ पोलिसांचे व सिंधुदुर्ग पोलिसांचे मोलाचे सहकार्य या आयोजनामध्ये मिळाल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या वतीने सिंधुदुर्ग पोलिसांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. तर गजानन कांदळगावकर यांनी सर्वांचे आभार मानले.
सोबत फोटो.
00000
राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग (जिमाका) दि. 29 : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन दरवर्षी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येते. यापूर्वी पिकस्पर्धेची सर्व प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवली जात होती. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी, खरीप हंगाम २०२६ पासून पिकस्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली (Online Portal) सुरू करण्यात आलेली आहे.त्यानुषंगाने अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन २०२६-२७ साठी राज्यस्तरावरून कृषी विभागामार्फत खरीप पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. सर्वसाधारण ...


Comments
Post a Comment