जिल्हा रुग्णालयातील उत्कृष्ट उपचारांमुळेच ठणठणीत बरा..! डिस्चार्ज मिळालेल्या 73 वर्षीय आजोबांची प्रतिक्रिया

सिंधुदुर्गनगरी, (जि.मा.का.) दि. 31 - जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी केलेली उत्कृष्ट सेवा आणि योग्य औषधोपचार यामुळेच आज मी कोरोना मुक्त होऊन घरी परतत आहे, अशी भावना, मालवण येथील 73 वर्षीय कोरोनामुक्त आजोबांनी व्यक्त केली. वेळेवर औषधे आणि इतर सर्व मदतीसाठी 24 तास रुग्णालयातील नर्स आमच्या सोबत होत्या. रोज कौन्सिलिंगच्या माध्यमातून आमच्या मनात सकारात्मकता निर्माण होत होती. यामुळेच अत्यवस्थ होऊनही कोरोनातून आज ठणठणीत बरा झालो आहे. असेही ते म्हणाले. मालवण येथील 73 वर्षीय आजोबांना आज जिल्हा सामान्य रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या. मालवणमधील या 73 वर्षीय आजोबांना 15 दिवसांपूर्वी ताप येत होता. त्यावेळी त्यांनी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यांनी दुसऱ्याच दिवशी कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला दिला. या सल्ल्यानुसार त्यांनी कोरोनाची चाचणी केली. त्यामध्ये ते पॉझिटिव्ह असल्याचे समजले. तापा खेरीज इतर कोणतेही लक्षण नसल्याने त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले. पण दोन दिवसात त्यांचा ताप वाढू लागला आणि इतर लक्षणेही जाणवू लागली. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये रात्रीच आणण्यात आले. कोणत्याही प्रकारचा वेळ न दवडता त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात येऊन इतर आजाराविषयी माहिती घेण्यात आली व ताततडीने त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. ऑक्सिजन लेवल 80 ते 85 दरम्यान होती, तर एचआरसीटी स्कोअर 16 होता. एकूणच परिस्थिती गंभीर म्हणण्यासारखीच होती. पण नियमीत व वेळेवर औषधोपचार मिळाले. जेवण घरूनच येत होते. पण रोज सकाळी रुग्णालयाकडून उकडलेली अंडी आणि दूध दिले जात होते. नियमित पणे हा आहार दिला जात होता. रुग्णालयातील या उपचारांमुळेच आज हे 73 वर्षीय आजोबा ठणठणीत होऊन आपल्या घरी परतले आहेत. डिस्चार्जच्या वेळी त्यांच्या सोबत त्यांचे जावई होते. आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले, परिस्थिती खूपच गंभीर होती. आम्हाला काय करावे ते सूचत नव्हते. देवाकडे प्रार्थना करणे याशिवाय आम्ही काहीही करू शकत नव्हतो. पण, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी यांनी योग्य व वेळेवर उपचार केले. त्यामुळे माझे सासरे आज ठणठणीत बरे होऊन घरी परतत आहेत. जिल्हा रुग्णालयातील सर्वच लोकांनी केलेले सहकार्य आणि प्रयत्न याला तोड नाही. त्यांच्या या प्रयत्नांना आमचा प्रणाम… 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'