खरीप हंगामात रासायनिक खतांचा वापर 10 टक्के कमी करण्याचे नियोजन
खरीप हंगामात रासायनिक खतांचा वापर 10 टक्के कमी करण्याचे नियोजन
सिंधुदुर्गनगरी, (जि.मा.का.) दि. 17 - जिल्ह्यात सुपिकता निर्देशांकानुसार रासायनिक खतांचा वापर 10 टक्केने कमी करण्याचे कृषि विभागाचे नियोजन आहे. जिल्ह्यात असलेल्या एकूण 741 गावांमध्ये राष्ट्रीय शाश्वत शेती अभियनांतर्गत जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रमांतर्गत तपासलेल्या मृज नमुन्यांच्या आधारे सुपिकता निर्देशांक फलक लावण्यात आलेले आहेत. जमीन सुपिकता निर्देशांकाच्या आधारे रासायनिक खतमात्रांचा अवलंब केल्यास तो प्रत्यक्षातील खतांच्या वापरापेक्षा कमी असेल व खत वापरामध्ये बचत शक्य होईल. यासाठी रासायनिक खतांच्या बचतीची विशेष मोहिम जिल्ह्यात खरीप 2021 राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने गावपातळीवर विविध कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनी रासायनिक खतांच्या वाढत्या किमती लक्षात घेता रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी पुढील प्रमाणे उपाययोजना कराव्यात. माती परिक्षण अहवालानुसार अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करावे, जैविक खतांचा वापर बीजप्रक्रिया दरम्यान करावा, रासायनिक खतांचा कार्यक्षमतेने वापर करण्यासाठी रासायनिक खतांबरोबर शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, गिरीपुष्पाचा पाला तसेच जिवाणू खतांचा एकात्मिकरित्या वापर करावा, रासायनिक खत योग्य वेळी देणे महत्वाचे आहे. नत्रयुक्त खतांची उपयुक्तता वाढविण्यासाठी युरिया खतांची मात्रा एकाचवेळी न देता वेगवेगळ्या पिकवाढीच्या काळात विभागुन देणे, उदा. भातपिकासाठी 40 टक्के नत्र लावणीच्या वेळी, 40 टक्के नत्र फुटवे फुटण्याची अवस्था, 20 टक्के नत्र फुलोऱ्याची अवस्था. रायझोबियम, ॲझाटोबॅक्टर, पी.एस.बी. या जिवाणू संवर्धकाचे बीजप्रक्रिया करून जमिनीतील नत्र, स्फुरद अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढणे. बीज प्रक्रिया करता न अल्यास भात पुर्नलावगडीच्यावेळी 1 लिटर जैवीक खत 100 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. रोपांची पुर्नलागवड करण्यापूर्वी रोपांची मुळे अर्धातास या द्रावणात बुडवून ठेवावीत व नंतर लागवड करावी. गिरीपुष्पाचा पाला चिखलणीच्या वेळी शेतात गाडावा. ( भातपिकास 1 गुंठ्यास 25 ते 30 किलो या प्रमाणे ). पिकांची फेरपालट करावी. जिल्ह्यातील जमिनीमध्ये जस्त व बोरॉन या सुक्ष्म मुलद्रव्यांची कमतरता आहे. यासाठी झिंक सल्फेट व बोरॅक्स या सुक्ष्म मुलद्रव्यांचा वापर शेणखतासोबत करावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment