मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा
- जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि.- 17 : जिल्ह्यात सर्व नगरपालिका, पंचायत व ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. मास्क न वापरणाऱ्यांना 200 रुपये दंड आकारण्यात येईल तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे आदेशही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील, नगर प्रशासन अधिकारी वैभव साबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोविड - 19 विषयक नियमांचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे अशा सूचना देऊन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या की, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी अजूनही सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, समाजिक अंतराचे योग्य ते पालन करावे, मास्कसह सॅनिटायझरचा वापर करावा, वारंवार हात धुवावेत. गर्दी करून कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम साजरे करण्यात येऊ नयेत. लग्न समारंभासारख्या कार्यक्रमामध्ये 50 एवढ्याच मर्यादित लोकांची उपस्थिती राहिल असे आयोजकांनी पहावे. तसेच अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 लोकांनीच उपस्थित रहावे. जिल्ह्यात कोरोना तपासणीचे प्रमाण वाढवण्यात यावे. कोविड केअर सेंटर्स कार्यान्वीत करण्याच्या दृष्टीने तसेच गृह अलगीकरण याविषयी काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. परराज्यातून विशेषतः राजस्थान, दिल्ली, गोवा, गुजरात आणि केरळ या राज्यांमधून येणाऱ्या लोकांची माहिती नागरिकांनी तातडीने प्रशासनास द्यावी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी सदर माहिती जमा करून दररोज जिल्हा प्रशासनास सादर करावी. तसेच या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात यावी व चाचणीचा अहवाल येई पर्यंत सदर व्यक्ती गृह अलगीकरणात राहतील याबाबत दक्षता घ्यावी. त्यासाठी पोलीस, ग्रामप्रशासन विभाग यांनी एकत्रित काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
सध्या महाविद्यालये सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमिवर महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचीही कोरोना तपासणी करण्यात यावी. जत्रांच्या बाबत मंदिरांचे पुजारी व ट्रस्टचे सदस्य यांच्याही तपासण्या करण्यात याव्यात. लक्षणे असणाऱ्या प्रत्येकाची कोरोना तपासणी होईल असे नियोजन करण्यात यावे अशाही सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या. तसेच जत्रेच्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने लोकांनी गाफिल न राहता कोरोनाचे नियम पाळावेत. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा फैलाव कमी होत आहे. त्यामुळे नागरिक गाफिल झाले आहेत. त्यामुळे आता कोरोनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियम कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने नियमांची कडक अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
00000
राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग (जिमाका) दि. 29 : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन दरवर्षी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येते. यापूर्वी पिकस्पर्धेची सर्व प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवली जात होती. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी, खरीप हंगाम २०२६ पासून पिकस्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली (Online Portal) सुरू करण्यात आलेली आहे.त्यानुषंगाने अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन २०२६-२७ साठी राज्यस्तरावरून कृषी विभागामार्फत खरीप पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. सर्वसाधारण ...
Comments
Post a Comment